सदाशिवराव मंडलिक यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण
By admin | Published: April 7, 2016 11:17 PM2016-04-07T23:17:30+5:302016-04-08T00:05:11+5:30
हमीदवाडा येथे कार्यक्रम : उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे
म्हाकवे : लोकनेते सदाशिवराव मंंडलिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्या, शनिवारी हमीदवाडा येथील कारखाना कार्यस्थळावर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण होत आहे, अशी माहिती मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी बुधवारी दिली. मंडलिक यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. मंडलिक यांनी केले आहे.
मंडलिक कारखान्याच्या सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या वार्षिक सभेत सभासद शेतकऱ्यांनी पिकविलेल्या उसातून प्रतिटन २५ रुपयांप्रमाणे मंडलिक यांचा पुतळा उभारणी व प्रेरणास्थळाची उभारणी करण्यासाठी, तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांनीही एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला होता.
या नियोजनाचा आढावा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी घेतला. यावेळी कागलचे उपसभापती भूषण पाटील, संचालक नंदकुमार घोरपडे, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, प्रशासन अधिकारी रावसाहेब बोंगार्डे, प्रदीप चव्हाण, आदी प्रमुख उपस्थित होते. (वार्ताहर)
असा आहे पुतळा :
उंची : १० फूट ६ इंच, चबुतरा : ६ फूट लांबी व ५ फूट रुंदी, वजन : १००० किलो (एक टन). पुतळा व चबुतऱ्यासाठी २५ लाख रुपये, तर १६० फूट लांबी व १२० फूट रुंदी असणाऱ्या प्रेरणास्थळासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च झाले आहेत.
मदतीचा हात
दुष्काळग्रस्तांना मदतीचा आर्थिक हात म्हणून उद्या, शनिवारी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आर्थिक मदतीसाठीचे स्टॉल उभे केले जाणार आहेत. ही मदत मंडलिक युवा प्रतिष्ठानतर्फे दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे.