हुपरीत उपनगराध्यक्ष, स्वीकृतसाठी फिल्डिंग विषय समिती सभापती निवडी शुक्रवारी : नगरसेवकांबरोबरच रौप्यनगरीवासियांनाही उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:20 PM2018-01-09T23:20:56+5:302018-01-09T23:22:39+5:30
हुपरी : नवनिर्मित हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेची पहिलीच सवर्साधारण सभा शुक्रवारी (दि. १२) आयोजित करण्यात आली आहे. या सभेत उपनगराध्यक्ष
हुपरी : नवनिर्मित हुपरी (ता. हातकणंगले) नगरपरिषदेची पहिलीच सवर्साधारण सभा शुक्रवारी
(दि. १२) आयोजित करण्यात आली आहे. या सभेत उपनगराध्यक्ष पदाबरोबच विविध विषय समिती सभापती निवड, तसेच दोन स्वीकृत नगरसेवकपद निवडीही करण्यात येणार आहेत. या पदावरती कुणाला लॉटरी लागणार याबाबत नूतन नगरसेवकांबरोबरच रौप्यनगरीवासियांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. या नगरपरिषदेची संपूर्ण जबाबदारी ही आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावरती असल्याने त्यांचा ‘शब्द’ हा ‘अंतिम शब्द’ असणार आहे.
उपनगराध्यक्षपदासाठी भाजपामधून जयकुमार माळगे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपा व कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडीतर्फे स्वीकृत नगरसेवकपदासाठी मातब्बरांनी आपलीच निवड होण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करीत जोरदार व्यूहरचना आखली आहे. नेत्यांची मनधरणी करण्यासाठी उंबरे झिजविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रौप्यनगरीच्या पहिल्या उपनगराध्यक्षपदी व स्वीकृत नगरसेवकपदी कोण? याबाबतची चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
नगरपरिषदेच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने नगराध्यक्षपदासह १८ पैकी सात जागा जिंकत सत्ता हस्तगत केली आहे. कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी पाच, शिवसेना, मनसे व अपक्ष प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले. निवडणुकीनंतर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी आपल्या ताराराणी आघाडीच्या पाच नगरसेवकांचा रौप्यनगरीच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा उपस्थित करीत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ दोन अपक्षांनीही थेट भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसेच मनसेच्याही दोन नगरसेवकांनी सत्तेसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजपा सध्या पूर्ण बहुमतात आला आहे.
भाजपाच्या सातपैकी चार नगरसेवक महिला आहेत. नगराध्यक्ष महिला असल्याने भाजपा नेते उपनगराध्यक्षपदीही एखाद्या महिलेला संधी देऊन महिलांच्या सन्मानाचा वेगळा संदेश देतात की पुरुष नगरसेवकाची निवड करतात याचीही उत्सुकता शहराला लागून राहिली आहे.
सद्य:स्थितीत उपनगराध्यक्ष पदासाठी जयकुमार माळगे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सभागृहातील पक्षीय बलाबल पाहता भाजपा व ताराराणी आघाडीच्या वाट्याला प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवकपद येणार असून दोन्हीही गटात इच्छुकांची संख्या अधिक आहे. भाजपाकडून शहराध्यक्ष सुदर्शन खाडे, अण्णासाहेब शेंडुरे, दिनकरराव ससे, सुनील कल्याणी, सुभाष कागले, तर ताराराणी आघाडीकडून पुंडलिकराव वार्इंगडे, अण्णासाहेब इंग्रोळे, प्रकाश जाधव, आदींच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी हालचाली सुरू झाल्या असून, इच्छुकांनी नेते मंडळीचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे. नेतेमंडळी आता कुणा कुणाला पदांची खिरापत वाटतात व कुणा कुणाला लॉटरी लागते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
उपनगराध्यक्षपदाबरोबच विविध विषय समिती सभापती निवड
दोन स्वीकृत नगरसेवकपद निवडीही करण्यात येणार