UPSC Result 2021: फळविक्रेता ते सनदी अधिकारी, सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेंची गरुडझेप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 11:34 AM2022-05-31T11:34:51+5:302022-05-31T12:15:47+5:30
लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे घराजवळ असणाऱ्या इक्बाल चाचा यांच्या फळाच्या गाडीवर तुटपुंज्या पगारावर काही काळ मदतनीस म्हणून काम केले. दरम्यान वडील तुकाराम यांचे अपघाती निधन झाले.
सिद्धनेर्ली : सिद्धनेर्लीचे सुपुत्र स्वप्निल तुकाराम माने यांनी यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत देशात ५७८ वा क्रमांक पटकावला आहे.
सोमवारी दुपारी निकाल जाहीर झाला. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी हे यश मिळवले आहे. स्वप्निल यांचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक क. विद्यामंदिर भाग शाळा नदीकिनारा येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण सिद्धनेर्ली विद्यालय येथे झाले. इयत्ता दहावीमध्ये ८४ टक्के मिळवूनही परिस्थितीमुळे त्यांना आयसीआरई (ICRE) गारगोटी येथे यांत्रिक अभियांत्रिकी मेकॅनिकल डिप्लोमासाठी प्रवेश घ्यावा लागला.
लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे घराजवळ असणाऱ्या इक्बाल चाचा यांच्या फळाच्या गाडीवर तुटपुंज्या पगारावर काही काळ मदतनीस म्हणून काम केले. भरपूर अभ्यास करून डिप्लोमामध्ये ८७ टक्के गुण मिळविले. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (VIT), पुणे या शिक्षण संस्थेत बी.ई. मेकॅनिकलसाठी प्रवेश मिळवला. त्यामध्ये १० पैकी ९.३ क्रेडिट मिळवून २०१८ मध्ये तेथेही अव्वल स्थान मिळविले. त्यानंतर पुणे येथे पूर्णवेळ स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.
पहिल्या दोन प्रयत्नांत पूर्व परीक्षेत अपयश आल्याने खचून न जाता पुन्हा न तयारी चालू ठेवली. दरम्यान वडील तुकाराम यांचे अपघाती निधन झाल्याने काही काळ गावी परतावे लागले. कोरोना काळात गावी राहून पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करून दोन्ही परीक्षेत पात्र होऊन मे २०२१ मध्ये मुलाखत झाली.
विशेष म्हणजे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून होऊनही स्वप्निल माने यांनी यूपीएससी परीक्षेसाठी पेपर लिहिण्यासाठी तसेच मुलाखतीसाठी माध्यम म्हणून इंग्रजी भाषेची निवड केली होती.
आजी-आजोबांमुळे गरुडझेप
स्वप्निल चौथीमध्ये असताना आईचा व २०१८ मध्ये वडिलांचा मृत्यू झाल्याने खचून न जाता हे यश प्राप्त केले. आजोबा दत्तात्रय यांनी चिकनच्या दुकानात काम करून, तर आजी सुशिला यांनी शेतात काम करत स्वप्निल यांच्या पंखाना बळ दिल्यानेच गरुडझेप घेतली.