‘दौलत’साठी १४ पर्यंत मुदत
By admin | Published: November 6, 2014 11:33 PM2014-11-06T23:33:40+5:302014-11-07T00:08:52+5:30
आंदोलनाचा इशारा : साखर कारखाना सुरू करण्यासाठी पाटणे फाटा येथील बैठकीत निर्णय
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळाला १४ नोव्हेंबर २0१४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. कारखाना चालू करावा, यासाठी हितचिंतकांची पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी डॉ. बी. एल. पाटील अध्यक्षस्थानी होते.
सुनील शिंदे यांनी प्रास्ताविक केले. दौलत कारखाना गेले तीन हंगाम बंद अवस्थेत आहे. मात्र, संचालक मंडळाकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. विश्वस्त या नात्याने त्यांची जबाबदारी असून, त्यांच्याकडून मात्र काहीच प्रतिसाद मिळत नाही. याबाबत चर्चा करून कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने तालुक्यातील जनतेतून उठाव करण्यासाठी तालुक्यातील हितचिंतकांची बैठक झाली. यावेळी एस. एम. कोले म्हणाले, या निवडणुकीत कारखाना चालू करण्याचे आश्वासन देत मते मागितली होती. मात्र, पराभव झाल्याने दोघेही लोकांसमोर येत नाहीत. लोकांची केवळ दिशाभूल करून त्यावर राजकारण केले जात आहे. जनतेला सर्वकाही माहीत असल्याने यापुढे या दोघांनाही उत्तर द्यावे लागेल.
अॅड. संतोष मळवीकर म्हणाले, संचालक मंडळ कुचकामी असून, त्यांनी कारखाना सुरू करावा, अन्यथा खुर्च्या खाली करा. रोजच्या तारखांना लोक कंटाळले आहेत. लोकांची दिशाभूल करून फार दिवस जात नाहीत. यापुढे कारखाना सुरू करण्यासाठी रस्त्यावर उतरविण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सर्वानुमते ‘दौलत बचाव’ समितीची स्थापन करण्यात आली. यामध्ये डॉ. बी. एल. पाटील, एन. एस. पाटील, संतोष मळवीकर, प्रभाकर खांडेकर, महादेव गावडे, कृष्णा रेगडे, एस. एम. कोले, गणेश चिटणीस, अपय्या नाईक, रवींद्र पाटील, चंद्रशेखर गावडे, गुंडोपंत सावंत, वैजनाथ कुट्रे, केदारी पाटील, विष्णू गावडे, वैजनाथ हुसेनकर, सुहास पाटील, प्रशांत कदम, नारायण धामणेकर, जयवंत बागवे, महनसेठ स्वामी, भागोजी कागणकर, बापू शिरगावकर, रूपेश अनगुडे, कृष्णा चव्हाण, सुनील नाडगौडा, आप्पाजी जाधव यांचा समावेश असून, या २५ व्यक्तिंना सर्वाधिकार देण्यात आले. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते. ए. जे. देसाई यांनी आभार मानले.
संचालक मंडळाविरोधात आंदोलन
कारखाना १४ नोव्हेंबरपर्यंत सुरू न झाल्यास १५ नोव्हेंबरला ‘दौलत’चे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील व संचालकांनी तालुक्याचे तहसीलदार यांच्यासमोर कारखाना सुरू करण्याबाबत कारणे द्यावीत. त्यानंतर १७ नोव्हेंबरपासून संचालक मंडळाच्या विरोधात हलकर्णी फाट्यावर ठिय्या आंदोलन करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.