दानोळी धान्य दुकानात गव्हामध्ये आढळला युरिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:58 AM2019-04-17T00:58:33+5:302019-04-17T00:58:38+5:30
दानोळी : येथील वारणा शक्ती तरुण मंडळ आणि वारणा नागरी पतसंस्थेच्या रास्त भाव धान्य दुकानातील गव्हामध्ये युरिया आढळला. त्यामुळे ...
दानोळी : येथील वारणा शक्ती तरुण मंडळ आणि वारणा नागरी पतसंस्थेच्या रास्त भाव धान्य दुकानातील गव्हामध्ये युरिया आढळला. त्यामुळे पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा दिसून आला आहे.
यापूर्वी काही गावांमध्ये सडलेले धान्य आढळले होते आणि आता तर युरिया आढळल्याने ग्राहकांच्या जिवाशी खेळले जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने धान्याच्या बाबतीत दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. बेघर वसाहतीतील या दुकानाबरोबर गावातील सर्व रेशन दुकानांत या महिन्यात पुरवठा केलेले धान्य खराब प्रतीचे असल्याचे ग्राहकांतून बोलले जात आहे. येथील रेशन कार्डधारक अर्जुन माने यांनी रेशनमधून नेलेल्या गहूमध्ये युरिया दिसून आला.
ही बाब त्यांनी धान्य विक्रेते रामगोंडा पाराज यांच्या निदर्शनास आणून दिली. ही माहिती गावात समजताच येथील बापूसाहेब दळवी, राघू होगले, दत्तात्रय जगदाळे, अर्जुन माने, पापालाल जमादार यांनी भेट देऊन माहिती घेतली.
दरम्यान, पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांना बोलावून लेखी माहिती घेण्यात आली. यावेळी धान्य गोडाऊन किपर यांनी या महिन्यात आलेले गावातील सर्व धान्य बदलून देणार असल्याचे सांगितले.