महाडिकांकडून सत्तेसाठी सर्व पक्षांचा वापर
By admin | Published: October 26, 2015 12:48 AM2015-10-26T00:48:15+5:302015-10-26T00:48:45+5:30
जयंत पाटील : देशभरात स्वबळावर लढणाऱ्या भाजपची कोल्हापुरात आघाडी का?
कोल्हापूर : नीतिमत्ता व तत्त्व नसलेल्या ‘ताराराणी’च्या नेतृत्वाने सत्तेसाठी दिसेल त्या पक्षाचा शिडीसारखा वापर केला आहे. सोयीचे राजकारण करणाऱ्या या सत्तेच्या दलालांना हद्दपार करा, अशा शब्दांत महादेवराव महाडिक यांचे नाव न घेता आमदार जयंत पाटील यांनी टीका केली. देशभरात स्वबळावर लढणाऱ्या भाजपचे कोल्हापुरात का धाडस झाले नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादीचे उमेदवार अजिंक्य चव्हाण, सुनीता पन्हाळकर, रामेश्वर पत्की, महेश सावंत, अर्चना साळोखे, दिलीप माने यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेत आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोकराव जाधव होते.
जयंत पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षांत विकास काय असतो, हे राष्ट्रवादी कॉँग्रेसने दाखवून दिले आहे. रस्ते, पाणी, गटारी या मूलभूत सुविधा पूर्ण केल्याच; पण त्याबरोबरच थेट पाईपलाईन, केशवराव भोसले नाट्यगृह, आदी महत्त्वाच्या बाबींसाठी कोट्यवधी रुपये दिले. याउलट सत्तेवर आल्यानंतर महिन्यात कोल्हापूरचा टोल हद्दपार करतो म्हणणाऱ्यांनी काय केले? चंद्रकांतदादा पाटील हे बांधकाममंत्री असताना ते का निर्णय घेत नाहीत? यामागे काहीतरी गौडबंगाल असून मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांचा पश्चिम महाराष्ट्राबाबतचा द्वेष यातून स्पष्ट होतो. शिवसेनेवर जोरदार टीका करीत, बाळासाहेब ठाकरेंनी अपमान झाला असता तर सत्तेला लाथ मारली असती; पण उद्धव ठाकरे मानहानी पत्करून सत्तेला चिकटून राहिल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. कॉँग्रेसमध्ये सरकारविरोधी काम करण्याची क्षमता नसल्याने केवळ राष्ट्रवादी कॉँग्रेसच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू शकते, याची जाणीव भाजप सरकारला झाल्याने ते राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खोटे आरोप करीत आहेत. पण एकदा चौकशी होऊ दे. त्यातून सत्य जनतेसमोर येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. प्रा. जयंत पाटील, माजी महापौर सुनीता राऊत, अजिंक्य चव्हाण, महेश सावंत, रामेश्वर पत्की, सुरेश गायकवाड, अॅड. अशोकराव साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी व्ही. बी. पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, भैया माने, परीक्षित पन्हाळकर, अजित राऊत, आदी उपस्थित होते. दरम्यान, सुर्वेनगर, साळोखेनगर येथेही जयंत पाटील यांनी प्रचार सभा घेतली.
दादांनी उड्या मारू नयेत
टोलमुक्त कोल्हापूर करण्यासाठी चारशे ते पाचशे कोटी देण्याची दानत भाजप सरकारमध्ये नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी जास्त उड्या मारू नयेत, असा टोला जयंत पाटील यांनी हाणला.