‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गैरवापर होतो हे तर जगजाहीर!

By admin | Published: September 20, 2016 11:41 PM2016-09-20T23:41:44+5:302016-09-20T23:57:55+5:30

पालकमंत्री शिवतारेंचे वक्तव्य; ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या आचारसंहितेचे केले कौतुक

The use of 'Atrocity' is the world! | ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गैरवापर होतो हे तर जगजाहीर!

‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गैरवापर होतो हे तर जगजाहीर!

Next

सातारा : ‘जो अ‍ॅट्रॉसिटी कायदा मागासवर्गीय बांधवांच्या संरक्षणासाठी तयार केला, त्याचाच गैरवापर काही मागासवर्गीय आणि काही राजकीय नेत्यांकडून होत असून, त्याला आता पायबंद घालणे आवश्यक बनले आहे,’ अशी परखड भूमिका साताऱ्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सातारा येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मांडली.
दरम्यान, मी सातारा किंवा पुणे येथील मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नाही, असे सांगत या मोर्चामध्ये मराठा बांधवांनी स्वयंस्फूर्तीने जी आचारसंहिता तयार केली आहे, त्याचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.
साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे मंगळवारी साताऱ्यात होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य रणजित देशमुख, साताऱ्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण त्याचबरोबर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री शिवतारे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर न्यायालयीन प्रक्रियेमुळे भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, मराठा क्रांती मोर्चा आणि मागासवर्गीयांचे प्रतिमोर्चे काढण्याचे आवाहन त्याचबरोबर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा होत असलेला गैरवापर यावर विवेचन केले. ते म्हणाले, ‘मराठा क्रांती मोर्चामध्ये होत असलेली गर्दी आणि त्यांनी स्वत:च तयार करून घेतलेली आचारसंहिता ही कौतुकास्पद आहे. २० ते २५ लाखांचे मोर्चे निघत असताना त्यामध्ये कोठेही अनुचित प्रकार घडत नाही. असे कधी कुठेच घडल्याचे आपल्याला पाहायला मिळालेले नाही. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, राणे समितीने जो निर्णय घेतला आता ती बाब न्यायालयात आहे. त्यामुळे सरकार म्हणून आम्ही जी काही कृती करू ती फार विचारपूर्वक करावी लागणार आहे.’
‘मी मोर्चात सहभागी होण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देणार आहे. लोकांच्या मनात काय आहे, त्यांच्याकडून काय अ‍ॅक्शन रिअ‍ॅक्शन येत आहेत याचा आढावा मी घेत आहे. मी स्वत: कानोसा घेतला आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत. आता त्या थांबायला तयार नाहीत.
त्यांना त्यांच्या हक्काविषयी लढायचे आहे आणि ते आता रस्त्यावर उतरले आहेत. सरकार आणि सरकारमधील एक घटक म्हणून आम्ही वाटाघाटी करत आहे. आम्ही या विषयावर सतर्क आहेच. समाजाच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवत आहे आणि यापुढेही त्या पोहोचवत राहणार आहे. त्यातून ठोस उपाययोजना आखता येणार आहेत. त्यामुळे आपल्यालाही सरकारची योग्य तीच कृती दिसणार आहे, असेही ते म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘भीम के नामपे खून बहता है तो बहने दो’ अशी भूमिका मांडत मागासवर्गीयांना प्रतिमोर्चे काढण्याचे केलेले आवाहन आणि राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गैरवापर होत असल्यामुळे तो रद्दच करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. या दोघांच्या भूमिकेवरही अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर होतो आहे हे तर जगजाहीर आहे. तो कसा झाला आणि कसा होत आहे. हेदेखील तुमच्या माझ्यासह सर्वांनाच माहीत आहे. जो कायदा ज्यांच्या संरक्षणासाठी झाला त्यांच्याकडूनच या कायद्याचा गैरवापर झाला, ही बाबदेखील नाकारून चालणार नाही. काही ठिकाणी अ‍ॅट्रॉसिटीच्या खोट्या केसेस झाल्याच्याही घटना आहेत. त्याचा अनेकांना त्रास झाला आहे. त्यामुळे या प्रकारांना पायबंद घालणे आवश्यक बनले आहे.’

Web Title: The use of 'Atrocity' is the world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.