सीसीटीव्हीचा अतिक्रमण रोखण्यासाठी उपयोग करा : सतेज पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 05:35 PM2020-08-02T17:35:13+5:302020-08-02T17:37:43+5:30
गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायत हद्दीत होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पाचा वापर करा, असे मार्गदर्शन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
कोल्हापूूर : गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायत हद्दीत होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पाचा वापर करा, असे मार्गदर्शन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
पाचगाव, मोरेवाडी व कळंबा या ग्रामपंचायतींसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. या सोहळ्यासाठी आमदार ऋतुराज पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, प्राचार्य डॉ. महादेव नरके ऑनलाईन सहभागी झाले होते.
सुरुवातीला काकडे यांनी स्वागत सूत्रसंचालन केले. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविकात या प्रकल्पाची माहिती दिली.
ते म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आतापर्यंत तीन प्रकल्प राबविण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर आणि इचलकरंजीमध्ये दोन टप्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागासाठी पहिल्या टप्यात पाचगाव, कळंबा आणि मोरेवाडी या तीन ग्रामपंचायतींसाठी पाचगाव येथे स्वतंत्र नियंत्रण कक्ष करण्यात आला आहे.
१४७ कॅमेरे बसविण्यात आले असून या मध्ये ६३ ठिकाणांचा समावेश आहे. यावेळी माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले,सीसीटीव्ही प्रकल्पामुळे निश्चितच सनियंत्रण राखले जाऊन कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून सुसंवाद राखला जाईल. गुन्हेगारांवर आळा बसेल आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. पोलिसांच्या माध्यमातून नुकतीच एक गाव एक गणपती यासाठी चर्चा घडवून आणली.
यामध्ये १३ गावांनी निर्णय घेतला आहे हे सुसंवादाचे यश आहे. अशाच पद्धतीने विश्वासात घेऊन कामे करावित.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून वेगळी सुरुवात करुन सर्वांना शिस्त लावता येईल. परदेशात गावागावात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. आपल्याकडेही ही पद्धत अंमलात येत आहे. या माध्यमातून सर्वांना शिस्त लागेल. पब्लिक ॲड्रेस यंत्रणा उभी करुन यामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांचा समावेश करत आहोत.
जो संदेश द्यावयाचा आहे तो या माध्यमातून देता येईल. थोड्या दिवसात ही यंत्रणा कार्यान्वित होईल. अशी यंत्रणा करणारा कोल्हापूर जिल्हा देशातील पहिला जिल्हा असेल. यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके म्हणाले, नवीन आव्हाने येणार आहेत. पोलिसिंगसाठी अशा उत्तम सुरुवात आहे. असे तंत्रज्ञान वापरुन जनतेमध्ये विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करु शकू.
पालकमंत्री पाटिलम्ह म्हणाले, कमी वेळेत चांगला प्रकल्प पोलीस यंत्रणेने उभा केला आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच गुन्हेगारीही वाढत आहे. ती रोखण्यासाठी आणि गुन्ह्यांची उकल करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. अनेक गावे आपल्यास्तरावर सीसीटीव्ही लावत आहेत.
याबाबत पोलीस विभागाने एक एसओपी तयार करावी. त्याच बरोबरच या गावांना एकत्रित कशा पद्धतीने जोडता येईल याचेही नियोजन करावे. राज्यातील ११५० पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बसविण्यास प्रारंभ झाला आहे.
गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायतींमध्ये होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी या प्रकल्पाचा व्यापक वापर करावा. महिन्यातील विशिष्ट तारखेला फोटो काढून ग्रामपंचायतीनी ते संकेतस्थळावर अपलोड करावेत. जेणेकरुन अतिक्रमणावरही नियंत्रण ठेवता येईल. पाचगाव येथील नियंत्रण कक्षातील लाईव्ह फीड पोलीस मुख्यालयात ठेवावे, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.
आमदार ऋतुराज पाटील यांची ऑनलाईन लोकार्पणाची संकल्पना
कोरोनाच्या संकट काळात गर्दी होणार नाही. त्याचे सर्व नियम पाळले जातील. यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी याचे लोकार्पण ऑनलाईन घ्यावे. त्याच बरोबर फेसबुक फेज लाईव्ह करुन सर्वांना उपलब्ध करुन द्यावे अशी संकल्पना आमदार ऋतुराज पाटील यांनी मांडल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकेत आवर्जून सांगितले.