बळाच्या वापराने विजयी रॅली रोखली

By admin | Published: April 13, 2016 11:17 PM2016-04-13T23:17:35+5:302016-04-14T00:02:56+5:30

अंबाबाई गाभारा प्रवेश वाद : कोल्हापूरच्या वेशीवरच तृप्ती देसार्इंसह कार्यकर्ते ताब्यात : विरोध डावलून कोंबले वाहनात

Use the force to stop the rally | बळाच्या वापराने विजयी रॅली रोखली

बळाच्या वापराने विजयी रॅली रोखली

Next

शनिशिंगणापूर येथील दर्शनानंतर कोल्हापूरला येणार असल्याचे देसाई यांनी जाहीर केले होते. कावळा नाका येथील ताराराणी पुतळ्याजवळून रॅलीने जाऊन चुडीदारवरच गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणार असल्याचेही त्यांनी पोलिसांना ठणकावून सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली होती. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख मंगळवारपासूनच देसाई यांच्या संपर्कात होते.
बुधवारी दुपारी चार वाजता देसाई कोल्हापुरात दाखल झाल्या. त्यानुसार दुपारी तीन वाजल्यापासून ताराराणी पुतळ्याजवळ पोलिस बंदोबस्त तैनात होता. सायंकाळी साडेचारपासून देसाई कधी येतात, याची प्रतीक्षा करीत पोलिस थांबले होते. महिला पोलिस समोर आणि मागे पुरुष पोलिस, असा बंदोबस्त लावला होता. सायंकाळी पाच वाजता राष्ट्रीय महामार्गाने देसाई यांचे वाहन कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी निघाल्याची माहिती ताराराणी चौकात पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांना मिळाली. त्वरित त्यांनी सर्व बंदोबस्तावरील पोलिसांना बोलावून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू केली. अर्धा किलोमीटरवर चालत गेल्यानंतर महालक्ष्मी हॉलसमोर देसाई यांच्या भूमाता ब्रिगेडच्या महिला, पुरुष कार्यकर्ते वाहनातून उतरून चालत रॅलीने येत असल्याचे दिसले.
पोलिसांनी त्वरित वाहने पर्यायी मार्गाने वळवून बॅरेकेटस लावून रस्ता अडविला आणि देसाई यांच्या नेतृत्वाखालील रॅलीला रोखले. राष्ट्रीय, राज्य पातळीवरील आलेल्या विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कॅमेरामन यांची यावेळी गर्दी झाली. पत्रकार आणि कॅमेरामन यांना पोलिस निरीक्षक अरविंद चौधरींसह पोलिसांनी ढकलून बाजूला काढले. त्यानंतर देसाई व सोबतच्या कार्यकर्त्यांभोवती महिला पोलिसांनी कडे केले. प्रथम सोबत आलेल्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करीत वाहनात कोंबण्यात आले. त्यानंतर देसाई यांच्यासह उर्वरित प्रमुख महिलांना वाहनात फरफटत नेऊन चढविले. सुमारे अर्धा तास पोलिसांनी नियोजनबद्धरीत्या बळाचा वापर करीत देसार्इंसह महिलांना ताब्यात घेतले. नंतर पोलिस त्यांना अलंकार हॉलमध्ये घेऊन गेले. सायंकाळी पोलिस बंदोबस्तातच देसार्इंसह मोजक्याच महिलांना दर्शन दिले.


भारतकुमार राणे - तृप्ती देसाई यांच्यात वाद...
रॅलीने निघाल्यानंतर सर्वप्रथम पोलिस उपअधीक्षक राणे यांनी तृप्ती देसाई यांना अडविले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तुम्हाला पुढे जाता येणार नाही. तुम्हाला ताब्यात घेतो, अटक करत नाही, असे राणे यांनी देसाई यांना सांगितले. त्यावेळी देसाई आणि राणे यांच्यात वाद झाला. शेवटी देसाई आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. त्यामुळे महिला पोलिसांना बोलावून ताब्यात घेण्याचा आदेश राणे यांनी दिला.


संरक्षणाऐवजी ताब्यात घेण्याचेच नियोजन
रॅलीने निघाल्यास देसाई यांच्यासह महिलांचे संरक्षण करण्याऐवजी रोखून ताब्यात घेण्याचेच नियोजन पोलिसांनी पहिल्यापासून केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक होती. ताराराणी चौक ते महालक्ष्मी हॉलपर्यंतच्या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.
स्थानिक महिलांचे बळ नाही
देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा आग्रह धरणाऱ्या स्थानिक डाव्या चळवळीतील महिलांनी देसाई यांच्या रॅलीकडे पाठ फिरवली. त्यामुळे देसाई यांना स्थानिक पातळीवर कोणतेच पाठबळ मिळाले नाही. रॅलीमध्ये शिरोळ, हातकणंगले, टाकवडे या भागातील सामान्य कुटुंबातील महिला मात्र सहभागी झाल्या होत्या. देसाई या पुण्यातून येऊन येथे कशाला आंदोलन करतात, अशी भूमिका घेऊन त्यांना विरोध झाला.
पेढे वाटणार आहे... अडवाल तर न्यायालयाचा अवमान
बंदी आदेश असल्यामुळे रॅलीने जाऊन गाभारा दर्शन घेण्यास सोडणार नाही, असे अधिकारी राणे यांनी देसाई यांना सांगितले. यावर देसाई म्हणाल्या, आम्ही पेढे वाटायला आलो आहोत. पेढे वाटून ताराराणी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार आहे. आम्हाला अडविले तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल.
पळापळ...
देसाई यांच्या रॅलीत लहान मुलांना कडेवर घेतलेल्या महिला व वृद्धाही होत्या. पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यानंतर काही महिला पळापळ करू लागल्या. यापैकी काहीजणी पळूनही गेल्या.
वाहनधारकांना उत्सुकता
प्र्रचंड पोलिस बंदोबस्त असल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनाही उत्सुकता होती. काहीजण वाहन थांबवून पोलिसांना कोण येणार? का बंदोबस्त लावलाय? अशी विचारणा करत होते.
महिला पोलिसांना घाम...
देसाई व शेवटी राहिलेल्या काही महिलांनी ताब्यात घेताना पोलिसांना जोरदार विरोध केला. त्यावेळी देसाई यांना अक्षरश: उचलून वाहनात घातले. प्रचंड उष्मा आणि ताकदीचा वापर यामुळे विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाहनात चढविताना महिला पोलिस अधिकारी व पोलिसांना चांगलाच घाम फुटला.
आमच्या हक्काचे...
देसाई यांच्यासह महिला व सोबत आलेल्या पुरुषांना ताब्यात घेत वाहनात कोंबले. त्यावेळी ‘भूमाता’च्या कार्यकर्त्यांनी ‘गाभारा प्रवेश आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’, ‘या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

विरोधाची दोन कारणे
देसाई यांच्या गाभारा प्रवेशास विरोध करण्यामागे दोन कारणे होती.
त्यांनी आपण ताराराणी चौकातून रॅली काढून दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यास हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा विरोध होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करुन त्यांना रॅलीच काढू दिली नाही.
अंबाबाई मंदिरात देवीच्या गाभाऱ्यात साडी नेसूनच दर्शनाला जावे, अशी परंपरा आहे, असे पोलिसांनी मंगळवारी त्यांना सांगितले होते. परंतु, त्याबद्दल लेखी पुरावा असल्यास द्यावा आणि साडीपेक्षा चुडीदारमध्ये महिलांचे सर्व अंग झाकले असते. देशात चुडीदार घातला म्हणून कोणत्याच मंदिरात प्रवेश रोखला जात नाही, तेव्हा तुम्हीही मला साडी नेसून येण्याचा आग्रह धरु नका, कारण मी ती कधीच नेसत नाही, असे देसाई यांचे म्हणणे होते.
तहसीलदारांकडून नोटीस...
रॅलीला प्रारंभ झाल्यानंतर त्वरित करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे यांनी देसाई यांना जमाव बंदीचा लेखी आदेश लागू केला. मात्र, आदेश डावलून अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेशाची विजयी रॅली सुरूच राहिल्यामुळे देसाई यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले.

Web Title: Use the force to stop the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.