गडहिंग्लजमध्ये तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:25 AM2021-04-10T04:25:09+5:302021-04-10T04:25:09+5:30
गडहिंग्लज : जमीन खरेदीच्या दस्त नोंदणीसाठी लागणाऱ्या ना-हरकत दाखल्यावर निवासी नायब तहसीलदारांची बनावट सही आणि बनावट शिक्का वापरल्याप्रकरणी जमीन ...
गडहिंग्लज :
जमीन खरेदीच्या दस्त नोंदणीसाठी लागणाऱ्या ना-हरकत दाखल्यावर निवासी नायब तहसीलदारांची बनावट सही आणि बनावट शिक्का वापरल्याप्रकरणी जमीन खरेदी देणारे संशयित भीमराव भरमा नावलगी (वय ७९) व खरेदी घेणारे संशयित दिनकर कृष्णा नरेवाडी व आनंदा कृष्णा नरेवाडी (रा. सर्व तेरणी, ता. गडहिंग्लज) यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, १५ मार्च २०२१ रोजी गडहिंग्लजचे तहसीलदार दिनेश पारगे यांनी येथील मुद्रांक व दस्तनोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट देऊन काही दस्तांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान दस्त क्रमांक २०७०/२०२० व २०६३/२०२० या जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील दोन दस्तांवर निवासी नायब तहसीलदार यांची स्वाक्षरी व शिक्का बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तहसील कार्यालयातील शिक्क्यांची पडताळणी केली असता ‘तो’ शिक्का बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासातून असे आणखी काही प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. अधिक तपास हवालदार संभाजी पाटील करीत आहेत.
* बनावट शिक्क्यांचा सुळसुळाट !
नोव्हेंबर २०२० मध्ये येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडून तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या ‘कजाप’ पत्रकातील फेरफार नोंदणीच्या प्रकरणात भूमी अभिलेख उपअधीक्षक यांची बनावट सही व त्यांचा बनावट शिक्का वापरल्याची दोन प्रकरणे उघडकीस आली होती. त्यापाठोपाठ गडहिंग्लज तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. यातील गुन्हेगार शोधून अशा प्रकारांना पायबंद घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.