बिगर शेती आदेशासाठी बनावट सही शिक्कांचा केला वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 11:23 AM2020-07-27T11:23:26+5:302020-07-27T11:25:08+5:30
जमिनीच्या व्यवहारासाठी तहसिलदारांची बनावट सही व शिक्क्यांचा वापर करुन त्या आधारे अकृषिक बिगर आकारणी निश्चितीचा खोटा आदेश तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडिकस आला.
कोल्हापूर : जमिनीच्या व्यवहारासाठी तहसिलदारांची बनावट सही व शिक्क्यांचा वापर करुन त्या आधारे अकृषिक बिगर आकारणी निश्चितीचा खोटा आदेश तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडिकस आला.
या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चौघा संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली. मंडल अधिकारी नामदेव जाधव यांनी याबाबतची फिर्याद दिल्याचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.
अटक केलेल्या संशयितांची नावे : सुनील कृष्णात खांडेकर (रा. बालिंगा), कृष्णा दादू खोत (रा. कणेरीवाडी, करवीर), शैलेश चंदरशेखर जाधव (रा. सासने कॉलनी). तर गजानन रवींद्र पाटील (रा. कणेरी, करवीर) यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पण चौघांवरही गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मौजे पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील जमीनीचा व्यवहारासाठी संशयित सुनील खांडेकर, कृष्णा खोत, शैलेश जाधव व गजानन पाटील या चौघांनी खरेदीपूर्व संचकारपत्र तयार केले. त्यानंतर त्यांनी दि. १५ फेब्रुवारी ते दि.२३ मार्च २०२० या कालावधीत तहसिलदारांच्या खोट्या सह्या व शिक्क्यांचा वापर करून अकृषिक बिगर आकारणी निश्चितीचा (बिगर शेती)चा बनावट आदेश तयार केला.
अशा प्रकारे शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार तहसिलदारांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने संबधितांवर कारवाईचे आदेश मंडल अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार अधिकारी जाधव यांनी करवीर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार चौघा संशयितांवर गुन्हा दाखल झाला. रात्री उशीरा संशयित आरोपी खांडेकर, जाधव व खोत या तिघांना अटक केल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी सांगितले.