ज्ञान, विज्ञानाचा व्यवहारात उपयोग करा
By admin | Published: January 31, 2015 12:21 AM2015-01-31T00:21:42+5:302015-01-31T00:24:55+5:30
डी. जे. नाईक : विद्यापीठात ‘बायोकॉम्प’ स्पर्धा उत्साहात
कोल्हापूर : विविध अभ्यासक्रमांतून मिळणाऱ्या ज्ञान आणि विज्ञानाचा दैनंदिन व्यवहारात विद्यार्थ्यांनी उपयोग करावा, असे आवाहन पुण्यातील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. डी. जे. नाईक यांनी आज, शुक्रवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभाग व मायक्रो बायोलॉजिस्टस सोसायटी आॅफ इंडियातर्फे आयोजित ‘बायोकॉम्प-२०१५’ या राष्ट्रीय जैवशास्त्रीय स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते.डॉ. नाईक म्हणाले, अभ्यासक्रमांत प्राप्त केलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा योग्य विनियोग व देशाच्या कल्याणासाठी त्यांचे योग्य उपयोजन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावे. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर्स व उपकरणांच्या माध्यमातून प्रकट केलेली वैज्ञानिक अभिव्यक्ती खूप मोलाची आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येकजण विजेता आहे. त्यातून मिळविलेला आत्मविश्वास हे त्याचे बक्षीस आहे. ते भावी आयुष्यातही आपली साथ करेल.
कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, विज्ञानाला चिकित्सक मनांची आवश्यकता असते, ज्यातूनच सत्य प्रकाशात येण्यास मदत होते. त्यासाठी कित्येकदा संयमाची कसोटीही लागत असते. अंतिमत: त्यातूनच बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनसंपन्न व्यक्तिमत्त्व विकसित होत असते. एकूणच वैज्ञानिक दृष्टिकोनाची रूजवात होणे सामाजिक स्वास्थ, विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे.
कार्यक्रमात मायक्रो बायोलॉजिस्टस सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. समन्वयक डॉ. के. डी. सोनावणे यांनी स्वागत केले. डॉ. एस. आर. वाघमारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
रोग नियंत्रण ते जलसिंचन...
या स्पर्धेत महाराष्ट्रासह गोव्यातील विविध महाविद्यालयांतून २५० स्पर्धक सहभागी झाले आहेत. पोस्टर स्पर्धा, मॉडेल कॉम्पिटिशनच्या माध्यमातून त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्राशी संबंधित संशोधनाची मांडणी केली. त्यात रोगनियंत्रण, कीड व्यवस्थापन, माती परीक्षण, फर्टिलायझर, जलसिंचन, आदींबाबत शोधनिबंध, प्रकल्प सादर केले आहेत. दिवसभर याठिकाणी पाहणी करण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गर्दी केली होती.