मंत्रिपदाचा उपयोग समाजकारणासाठी करा
By Admin | Published: November 1, 2015 12:35 AM2015-11-01T00:35:17+5:302015-11-01T00:59:25+5:30
हसन मुश्रीफ : मौजे सांगाव येथे रस्ते बांधकामाच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांतदादांवर टीका
कागल : आजपर्यंत जे जे बांधकाममंत्री या महाराष्ट्रात झाले, त्यांनी आपण ज्या शहरातून अथवा भागातून आलो, त्या त्या शहरासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी देऊन मोठा विकास घडविला आहे. मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यास एकमात्र अपवाद आहेत. मंत्रिपदाचा वापर ते फक्त राजकारण करण्यासाठीच करीत आहेत. चंद्रकांतदादा... मंत्रिपदाचा थोडातरी उपयोग सामजकारणासाठी करा, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.
मौजे सांगाव येथे आयोजित रस्ते बांधकामाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील (बापू) होते. कार्यक्रमास भैया माने, शाहू साखर कारखान्याचे संचालक युवराज अर्जुना पाटील, मंडलिक कारखान्याचे संचालक शंकर व्यंकू पाटील, सरपंच स्वाती पाटील, वंदना पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, सर्वाजनिक बांधकाम खाते मंत्रिपदासारखे महत्त्वपूर्ण खाते असताना कोणताच भरीव निधी ते कोल्हापूरसाठी आणू शकत नाहीत, हे करवीरकरांचे दुर्दैव आहे. पालकमंत्री म्हणून कोणतीच भूमिका ते घेत नाहीत. मग जिल्ह्यातील जनतेला तुमच्या मंत्रिपदाचा उपयोग काय? यापुढे तरी त्यांनी निव्वळ राजकारण न करता समाजकारणाला महत्त्व द्यावे. राज्य शासनात ताळमेळ नाही. ‘कोण म्हणतो पंजा मारतो, कोण म्हणतो दात मोजतो’. जनतेकडे त्यांचे लक्ष नाही. हे सरकार टिकेल की नाही, अशी परिस्थिती झाली आहे. कागल-गडहिंग्लज मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. यावेळी त्यांनी क. सांगाव ते पंचतारांकित औद्योगिक वसाहत, क. सांगाव ते सुळकूड रस्त्यासाठी ३0 लाखांचा निधी देण्याची घोषणा केली.
युवराज पाटील म्हणाले, मंत्रिपदावर असताना आमदार मुश्रीफ यांनी प्रचंड निधी मतदारसंघात आणून मतदारसंघाचा कायापालट केला. आता ते प्रभावी विरोधी पक्षाचे काम करीत आहेत. विकासकामासाठी निधी खेचून आणण्याची धमक त्यांच्यात असल्याने आता हा दहा कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
बाजार समितीचे संचालक कृष्णात पाटील यांनी स्वागत केले. यावेळी संजय हेगडे, राजेंद्र माने, विजयसिंह पाटील, कल्लेश माळी, अरुण पाटील, रावसाहेब मगदूम, विक्रमसिंह माने, इनायत मुल्ला, आदी उपस्थित होते. नंदकुमार पाटील यांनी आभार मानले.