नोकरीसाठी पैसे घेताना मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या नावांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:08 AM2019-06-19T00:08:57+5:302019-06-19T00:11:36+5:30
तहसीलदार म्हणून नोकरी लावण्यासाठी ८५ लाख रुपये आणि चार गुंठ्यांचा प्लॉट उकळण्याच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांंत पाटील यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे.
कोल्हापूर : तहसीलदार म्हणून नोकरी लावण्यासाठी ८५ लाख रुपये आणि चार गुंठ्यांचा प्लॉट उकळण्याच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांंत पाटील यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून याप्रकरणी संशयित प्रसाद प्रभाकर शिंदे (मूळ रा. गडहिंग्लज, सध्या रा. कोरेगाव पार्क, पुणे) याची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यात येणार आहे. त्याच्या शोधासाठी एक पथक रवाना झाले आहे.
भाजपचे कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा घेतल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या नावाचा वापर, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाºयाला प्लॉट देण्यासाठी तो संबंधितांकडून लिहून घेतल्याचा मुद्दा यामध्ये कळीचा ठरत असून, अधिवेशनामध्येही हे प्रकरण गाजण्याची चिन्हे आहेत.
अधिक माहिती अशी, तक्रारदार समृद्ध दिलीप मोरे (रा. बालशाही अपार्टमेंट, मंगळवार पेठ, कोल्हापूर) हा नेमबाज आहे. त्याचे वडील दिलीप मोरे हे राज्य उत्पादन शुल्क विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. संशयित शिंदे याने समृद्ध मोरे याला पिस्तूल परवाना मिळवून देऊन विश्वास संपादन केल्यानंतर त्याला क्रीडा कोट्यातून तहसीलदारपदी नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्याबदली २०१४ पासून शिंदे याने मोरेकडून वेळोवेळी एकूण ८५ लाख रुपये घेतले. त्याने मोरेला तोरस्कर चौक, बुधवार पेठ येथील संदीप देसाई यांच्या कार्यालयासमोर अनेक वेळा नेले आहे. बाहेर उभे करून तो आतमध्ये जात होता. त्यानंतर देसाई यांच्याशी बोलणे झाले आहे, आपले काम लवकरच होईल, मंत्रालयातून फोन येईल, असे त्याला सांगितले जात होते.
मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या ओएसडीच्या नावाने मोरे याला बनावट फोनही करण्यात आले. मोरे याचा कोल्हापुरात चार गुंठे प्लॉट होता. त्याचे शिंदे याने आपल्या नावावर खरेदीपत्र केले. पैसे, प्लॉट देऊन नोकरी नाही; त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे समजताच समृद्ध मोरे याने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची सोमवारी (दि. १७) सायंकाळी भेट घेतली. घडलेला प्रकार सांगून तक्रार अर्ज दिला. देशमुख यांनी संबंधित अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत याप्रकरणी चौकशी करत आहेत.
कोण हा शिंदे?
संशयित प्रसाद शिंदे हा मूळचा गडहिंग्लज येथील आहे. तो भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करीत होता. त्यातून त्याची पक्षाचे तत्कालीन महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्याशी ओळख झाली. त्यातून त्यांची घनिष्ठ मैत्री झाली. शिंदे हा भामटा असून त्याने मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या नावांचा वापर करून अनेकांची फसवणूक केल्याचे समजते. तो सध्या पुण्यात राहत असून, फसवणूक प्रकरणाची चाहूल लागताच त्याने मोबाईल बंद ठेवला आहे.
व्यवहाराचे डिटेल्स पोलिसांकडे
तक्रारदार मोरे याने संशयित शिंदे याच्यासोबत केलेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये काही स्टॅम्प केले आहेत. काही रक्कम रोख स्वरूपात, तर काही धनादेश व खात्यावर जमा केली आहे.
त्याचे संपूर्ण डिटेल्स त्यांनी अर्जासोबत पोलिसांना दिले आहेत. शिंदे याच्या बँक खात्यासह मोबाईल कॉल डिटेल्सची माहिती पोलीस घेत आहेत.
खेळाडूची नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल आहे. त्याची चौकशी सुरू असून यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर