कोल्हापूर रेल्वे स्थानकातील नवा प्लॅटफॉर्म सुरू, नव्या रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 12:56 PM2022-12-30T12:56:30+5:302022-12-30T13:04:46+5:30
कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस पहिल्यांदा धावली
कोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावरील नव्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारचा वापर गुरुवारपासून सुरू करण्यात आला. त्यावरून दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस सुटली. या प्लॅटफॉर्ममुळे स्थानकातून नव्या रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्लॅटफॉर्मच्या कामाचा प्रारंभ सन २०१९ मध्ये झाला. मात्र, कोरोनामुळे थांबलेले काम गेल्या वर्षभरापासून पुन्हा सुरू झाले. त्यातील अंतिम टप्पा पूर्ण करण्यासाठी मध्यरेल्वेने दि. २१ डिसेंबरपासून आठ दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला. ब्लॉक बुधवारी रात्री संपला. त्यानंतर गुरुवारी रेल्वेच्या पुणे येथील अभियांत्रिकी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी मालवाहतूक रेल्वेच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मची चाचणी घेतली.
ती यशस्वी झाल्याने कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस तेथून सोडण्यात आली. या प्लॅटफॉर्मवर आता २४ डब्यांची रेल्वे थांबणार आहे. सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे स्थानकाची क्षमता वाढणार आहे.
रेल्वे सेवा पूर्ववत सुरू
मेगा ब्लॉक संपल्याने कोल्हापूरची रेल्वेसेवा गुरुवारपासून पूर्ववत सुरू झाली. तिरुपती, नागपूर एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-सातारा, मिरज, पुणे या पॅसेंजर रेल्वे कोल्हापुरात सुटल्या. मात्र, कोयना एक्स्प्रेस मिरज येथून सुटली.
आता स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची संख्या चार झाली आहे. त्यामुळे सध्या होणारी यार्डमधील अडचण कमी होईल. रेल्वेचे इंजिन वळविण्यातील वेळ वाचणार आहे. नव्या लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू करता येणार आहेत. -विजयकुमार, प्रबंधक, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस
नव्या प्लॅटफॉर्मची उभारणी आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एक, दोनच्या विस्तारीकरणाची प्रतीक्षा संपली. आता कोल्हापूरच्या रेल्वे सेवेला गती मिळेल. अमृतसर, जम्मूतावी, जयपूर या मंजूर रेल्वे कोल्हापुरातून सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या रेल्वे लवकर सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा. -शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे, विभागीय रेल्वे सल्लागार समिती