प्लास्टिक पिशव्यांचा वापर, पाच दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 02:37 PM2020-11-28T14:37:12+5:302020-11-28T14:38:47+5:30
Muncipal Corporation, kolhapur, Plastic ban प्लास्टिकबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाई सुरू केली. शुक्रवारी पालिकेच्या पथकांनी शहरातील विविध पाच दुकानांवर प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कोल्हापूर : प्लास्टिकबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाई सुरू केली. शुक्रवारी पालिकेच्या पथकांनी शहरातील विविध पाच दुकानांवर प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
शासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असतानाही शहरात काही व्यापारी, व्यावसायिक प्लास्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या सूचनेनुसार आरोग्य विभागाच्या पथकांमार्फत धडक मोहीम हाती घेतली आहे.
शुक्रवारी या पथकांनी प्लास्टिक प्रतिबंधात्मक केलेल्या कारवाईत सत्यम ट्रेडर्स, अजय ट्रेडर्स, साहिल मटण शॉप, क्वालिटी फूड आणि साने गुरुजी वसाहतीमधील एका किराणा दुकानावर कारवाई करुन त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे रुपये २५ हजारांचा दंड वसूल केला आहे.
ही कारवाई विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर व निखिल पाडळकर यांनी केली; तर साने गुरुजी वसाहतीमधील एका किराणा दुकानावर आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार आणि मुकादम दाभाडे यांनी कारवाई केली. तसेच साने गुरुजी वसाहत परिसरात या पथकाने प्लास्टिक बंदीसंदर्भात मोहीम राबवून व्यापारी व दुकानदारांमध्ये जागृतीही केली.
प्लास्टिकचा वापर करणे हा गुन्हा असून प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य पथकांनी ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश प्रशासक बलकवडे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या प्लास्टिक व थर्माकोल प्रतिबंधक नियम २०१८ नुसार प्लास्टिक व थर्माकोल, इत्यादींपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतुकीस प्रतिबंध केला आहे.
महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिकबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. प्लास्टिक व थर्माकोल प्रतिबंधक नियमानुसार दंडात्मक कारवाई तसेच वर्षाचा कारावास होऊ शकतो.