प्रदूषणमुक्त रंकाळ्याचा प्रयोग फुस्स!

By admin | Published: October 31, 2014 01:06 AM2014-10-31T01:06:25+5:302014-10-31T01:09:50+5:30

सांडपाणी वळविण्यात अपयश : चार वर्षे, साडेआठ कोटी खर्चून केलेल्या ड्रेनेजलाईनच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह

The use of pollution-free exchange! | प्रदूषणमुक्त रंकाळ्याचा प्रयोग फुस्स!

प्रदूषणमुक्त रंकाळ्याचा प्रयोग फुस्स!

Next

भारत चव्हाण - कोल्हापूर
प्रदूषित पाण्यामुळे मरणयातना भोगत असलेल्या रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी वळविण्यासाठी चार वर्षे आणि साडेआठ कोटी रुपयांचा निधी खर्च करून भूमिगत ड्रेनेज लाईन टाकली खरी; परंतु केवळ प्रशासनाच्या देखभालीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आजही आठ ते दहा दशलक्ष लिटर प्रतिदिन सांडपाणी रंकाळा तलावात थेट मिसळत आहे. एवढा मोठा खर्च करूनही हा प्रकल्प अयशस्वी झाल्याचेच त्यातून स्पष्ट झाले आहे.
कळंबा जेल परिसर, नाळे कॉलनी, संभाजीनगर, मोहिते कॉलनी, साळोखेनगर, आपटेनगर, साळोखे पार्क, संतोष कॉलनी, तुळजाभवानी वसाहत, गणेश कॉलनी, राजलक्ष्मीनगर, पांडुरंगनगरी या परिसरातील सांडपाणी एका ओढ्याद्वारे शाम हौसिंग सोसायटीजवळून थेट रंकाळा तलावात मिसळते. तब्बल आठ ते दहा दशलक्ष लिटर प्रतिदिन मैलामिश्रित सांडपाणी रंकाळा तलावाचे पाणी दुर्गंधीयुक्त करून टाकत आहे.
हे सांडपाणी वळवून ते दुधाळी नाल्यापर्यंत वाहून नेण्यासाठी ९०० एमएम जाडीची मोठी जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारच्या राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेकडे पाठविला होता. केंद्र सरकारकडून मिळालेल्या साडेआठ कोटींच्या निधीतून हे कामही हाती घेण्यात आले. तब्बल चार वर्षांच्या प्रयत्नांनंतर गेल्या चार महिन्यांपूर्वी ते पूर्ण झाले. मात्र, थेट तलावात आजही सांडपाणी मिसळतेच आहे.
कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा
शाम हौसिंग सोसायटीजवळ दगडी बंधारा बांधून सांडपाणी अडविण्यात आले आहे. त्या ठिकाणी सतरा लाख रुपये खर्च करून एक ईडी वर्क करण्यात आले. बंधाऱ्याला तटलेले सांडपाणी शाम हौसिंग सोसायटी ते रंकाळा टॉवर या मार्गावर टाकलेल्या ड्रेनेज लाईनला जोडले आहे; परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून बंधाऱ्याला फळ्याच जोडलेल्या नाहीत. त्यामुळे सांडपाणी ओढ्यातूनच पुढे तलावात मिसळते. आज, गुरुवारी सकाळीही हीच स्थिती होती. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेचे रंकाळ्याचे आयुष्य अंधकारमय बनले आहे. या कर्मचाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.
सर्वांत कठीण काम केले पूर्ण
शाम हौसिंग सोसायटी ते रंकाळा टॉवर या तीन किलोमीटर मार्गावर भूमिगत ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम एक वर्षात पूर्ण करायचे होते; परंतु टणक लागलेली जमीन, ब्लास्टिंगचा वापर, अनेक जलवाहिन्यांचा अडसर, ड्रेनेज लाईनचे क्रॉसिंग अशा विविध कठीण कामांमुळे तब्बल साडेतीन वर्षे हे काम लांबले. पालिकेच्या इतिहासातील सर्वांत अवघड काम म्हणून याकडे पाहिले गेले. काम घेतलेल्या ठेकेदाराच्या नाकी चांगलाच दम आला. मनपाचे अधिकारीही ‘कधी एकदा काम होतंय’ असे म्हणत होते. इतक्या अडचणीतून काम पूर्ण केल्यानंतरही जर अधिकारी आणि कर्मचारी हलगर्जीपणा करीत असतील आणि सांडपाणी तलावात मिसळत असेल तर त्याला काय म्हणायचे?
परतीच्या पावसाचे कारण
महापालिकेचे अधिकारी अवकाळी पावसाचे कारण देत आहेत. पावसाचे पाणी रोखण्याची क्षमता या ड्रेनेज लाईनमध्ये नाही, असा त्यांचा दावा आहे. परंतु, पाऊस संपला तरीही थेट तलावात पाणी मिसळते, त्याला कोण जबाबदार? याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. परंतु, आयुक्त, अतिरिक्त आयुक्तयांनी मात्र त्याचे उत्तर शोधून उपाययोजना राबविली पाहिजे.
कामच चुकीचे झाल्याचा संशय
शाम हौसिंग सोसायटी येथून सांडपाणी वळविण्याचे कामच चुकीचे झाल्याचा संशय बळावला आहे. सुरुवातीला या कामाची चाचणी घेण्यात आली त्यावेळी या ड्रेनेज लाईनमधून सांडपाणी पुढे सरकत नव्हते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी काम करताना ड्रेनेज लाईनमध्ये दगड-माती अडकली असण्याची शक्यता व्यक्त करीत वेळ मारून नेली. दगड-माती काढण्यातही काही दिवस घालविले; परंतु त्यानंतर तरी अद्याप पूर्ण क्षमतेने सांडपाणी वाहून गेल्याचे कधीच निदर्शनास आले नाही. ओढ्याच्या प्रवाहाला बंधारा घालून रोखल्यानंतर नव्वद अंशांच्या काटकोनात हे पाणी घेण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पुढे सरकण्यास पुरेसा दाब मिळत नाही. त्यामुळे सांडपाणी ड्रेनेज लाईनमधून कमी जाते आणि बंधारा ‘ओव्हरफ्लो’ होऊन तलावात जादा मिसळते. म्हणूनच तांत्रिक पातळीवरही या कामाची चौकशी तसेच तपासणी होण्याची आवश्यकता आहे.

Web Title: The use of pollution-free exchange!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.