कारखान्यांच्या छतावर काम करताना सुरक्षा साधनांचा वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:22 AM2021-05-14T04:22:43+5:302021-05-14T04:22:43+5:30
कोल्हापूर : कारखान्यांच्या छतावरील कामे करताना पुरेशा प्रमाणात सुरक्षा साधनांचा वापर केला जात नाही. त्यामुळे उंचावरून पडून कामगार मृत्युमुखी ...
कोल्हापूर : कारखान्यांच्या छतावरील कामे करताना पुरेशा प्रमाणात सुरक्षा साधनांचा वापर केला जात नाही. त्यामुळे उंचावरून पडून कामगार मृत्युमुखी पडतात. त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षा साधने वापरून कामे करावीत, असे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सह संचालक सुरेश जोशी यांनी केले आहे.
अनेक कारखान्यांमध्ये पावसाळ्यापूर्वी छताचे काम केले जाते. छताची उंची किमान ३० ते ४० फुटांपर्यंत असते. पुरेशी सुरक्षा साधने न वापरल्यामुळे छतावरून पडून कामगारांचा मृत्यू होतो. त्यामुळे छतावर काम करताना पर्यवेक्षकाच्या देखरेखेखाली हे काम करावे. सुरक्षा बेल्टचा वापर करून हे काम करावे. त्याची खात्री करावी. छतावर लाईफ लाईनची व्यवस्था कारखाना प्रशासनाने करावी. क्राऊलिंग बोर्डस व डक लॅंडरचा वापर अशा वेळी करावा. छताच्या खालील जमिनीवर कोणास काम करण्यास देऊ नये. वरून वस्तू पडून खालील कामगार जखमी होऊ शकतो. छताच्या खाली सुरक्षा जाळी बसवावी. वर्क परमिट पद्धतीचा अवलंब करावा. काही कारखान्यांत प्रकाश येण्यासाठी पीपी शिट लावल्या जातात. त्याच्यावर कामगारांचा पाय पडून ते पडू शकतात. अशा वेळी त्या पीपी शिटच्या खाली लोखंडी जाळी बसविणे गरजेचे आहे. या सर्व सुरक्षा योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जोशी यांनी पत्रकाद्वारे सर्व उद्योगांना केले आहे.