कारवाई टाळण्यासाठी ‘दिखाऊ’ हेल्मेटचा वापर

By admin | Published: June 21, 2017 12:57 AM2017-06-21T00:57:57+5:302017-06-21T00:57:57+5:30

दुचाकीधारकांचा फंडा : थोड्या रकमेसाठी जीव धोक्यात घालून काहींचा प्रवास

Use of 'showy' helmet to prevent action | कारवाई टाळण्यासाठी ‘दिखाऊ’ हेल्मेटचा वापर

कारवाई टाळण्यासाठी ‘दिखाऊ’ हेल्मेटचा वापर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : विना हेल्मेट दुुचाकी चालविणाऱ्यांविरोधात कोल्हापूरमध्ये पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईतील पाचशे रुपयांचा दंड टाळण्यासाठी वाहनधारकांकडून दिखाऊ स्वरूपातील हेल्मेटचा वापर सुरू आहे. अशा हेल्मेटमुळे जीव धोक्यात घालून काहींचा प्रवास सुरू आहे.
महामार्गावर वाहनधारकांना हेल्मेटचा वापर बंधनकारक केला आहे. जे वाहनधारक विना हेल्मेट असतील, त्यांना पाचशे रुपयांचा दंड करण्यात येत आहे. पोलिसांनी ही कारवाई कडक केली आहे. त्यामुळे अशा कारवाईतून वाचण्यासाठी अनेक दुचाकीधारकांकडून हेल्मेट खरेदीची धावपळ सुरू आहे. यांतील काहीजण सुरक्षित आणि चांगल्या दर्जाच्या हेल्मेटला प्राधान्य देत आहेत. मात्र, काही वाहनधारकांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या आणि आयएसआय मार्क नसलेल्या केवळ दिखाऊ स्वरूपातील हेल्मेटचा वापर केला जात आहे. शहर आणि शहरालगतच्या महामार्गांवर ठिकठिकाणी अशा दिखाऊ हेल्मेटची विक्री सुरू आहे.
यात हाफ अँड विथ ग्लास, कॅप आणि फुल या प्रकारात हेल्मेट उपलब्ध आहेत. यातील फुल हेल्मेट ही ३५० ते ४००, हाफ अँड विथ ग्लास हे ३५०, तर कॅपची किंमत २०० ते ३०० रुपये इतकी आहे. यातील बहुतांश हेल्मेट बघताच ती केवळ दिखाऊ असल्याचे स्पष्ट होते. यात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक घटकांचा समावेश नाही. हेल्मेटची मागणी, ग्राहकांची गरज आणि आर्थिक स्थिती लक्षात घेऊन विक्रेत्यांनी विविध स्वरूपांतील हेल्मेट बाजारपेठेत उपलब्ध करून दिली आहेत.
सध्या दिल्ली आणि चेन्नई येथून हेल्मेट विक्रीसाठी कोल्हापुरात येत आहेत. विना हेल्मेट प्रवास करून दंड भरण्यापेक्षा तीनशे रुपयांपर्यंतचे अशा स्वरूपातील हेल्मेट घेण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे. मात्र, ते या पर्यायातून स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहेत.

Web Title: Use of 'showy' helmet to prevent action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.