‘साखर खाल्लेला माणूस’चा प्रयोग रोखला

By admin | Published: November 17, 2015 12:15 AM2015-11-17T00:15:25+5:302015-11-17T00:26:02+5:30

प्रीमायसेस लायसेन्सचा अभाव : व्यवस्थापनालाही नोटीस; जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने परवानगी

The use of 'sugar-eaten man' was stopped | ‘साखर खाल्लेला माणूस’चा प्रयोग रोखला

‘साखर खाल्लेला माणूस’चा प्रयोग रोखला

Next

कोल्हापूर : शाहू स्मारक भवन येथे सोमवारी सायंकाळी सात वाजता ठेवण्यात आलेला ‘साखर खाल्लेला माणूस’ हा विद्यासागर अध्यापक यांनी संयोजन केलेला प्रयोग करण्यास भवनाचे फायर, स्ट्रक्चरल आॅडिट झाले नसल्याने जिल्हा करमणूक कर अधिकारी कल्पना ढवळे यांनी परवानगी नाकारली. अशा प्रकारचे आॅडिट नूतनीकरण केशवराव भोसले नाट्यगृहाचे झाले नसल्याचे पुढे आले आहे. नाट्यगृहात प्रेक्षकांच्या सुरक्षेचा विचार करणे जरुरीचे आहे. या सुरक्षिततेमध्ये इमारत किती वर्षांपूर्वीची आहे? संकटकाळी प्रेक्षकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी काय पर्यायी व्यवस्था आहे? याचबरोबर नाट्यगृहात प्रयोगादरम्यान आग लागल्यास ती विझविण्याची तत्काळ व्यवस्था आहे की नाही? अशा सर्व बाबींचा अभ्यास व परीक्षण फायर, स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये केले जाते. हे आॅडिट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होते. त्यानुसार त्या नाट्यगृहास ‘प्रीमायसेस लायसेन्स’ जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा करमणूक कार्यालय देत असते. असे आॅडिट जिल्हाधिकारी पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या राजर्षी शाहू स्मारक भवनाचे झाले नसल्याने सोमवारी या भवनात आयोजित केलेला ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाट्यप्रयोगास परवानगी नाकारली गेली. सायंकाळी प्रयोग असताना ऐनवेळी प्रथम तोंडी नोटिसीद्वारे प्रयोग रोखण्याची नोटीस आयोजकांना बजावली. त्यामुळे आनंद कुलकर्णी, प्रफुल्ल महाजन, रवींद्र काळे, आदी नाट्यकर्मी मंडळी याबद्दल जिल्हाधिकारी यांना भेटण्यास गेली असता त्यांनी हा प्रयोग करण्यास परवानगी दिली. मात्र, फायर आॅडिट, स्ट्रक्चरल आॅडिटचा प्रश्न अनुत्तरितच राहिल्याने पुन्हा प्रेक्षकांवर टांगती तलवारच राहणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली भवन असताना हा प्रश्न तेथेच सोडविण्याची मागणी नाट्यकर्मीतर्फे केली जाते. (प्रतिनिधी)


राज्यातील बहुतांशी नाट्यगृहे
‘प्रीमायसेस लायसेन्स’विना
पुणे येथील बालगंधर्व नाट्यगृहाचा अपवाद वगळता अण्णा भाऊ साठे, भीमसेन जोशी, यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले यांसह राज्यातील ९0 टक्के नाट्यगृहे ही ‘प्रीमायसेस लायसेन्स’विना आहेत. त्यात ही नाट्यगृहे बागेचे किंवा अन्य आरक्षण असताना त्या ठिकाणी बांधलेली आहेत. त्यामुळे तेथील ‘प्रीमायसेस लायसेन्स’चा प्रश्न अनुत्तरित आहे. हा दाखला असूनही शाहू स्मारक भवन येथे जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या ट्रस्टला कसे रोखले जाते? अंतर्गत बाब असूनही ती पूर्ण करणे गरजेचे आहे. याचा नाट्यकर्मींना त्रास होता कामा नये, असे लावणी निर्माता महासंघाचे उपाध्यक्ष रवींद्र काळे यांनी सांगितले.


शाहू स्मारक भवन व केशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापकांना १२ व १७ आॅक्टोबरला नाट्यगृहाचे स्ट्रक्चरल, फायर आॅडिट झालेले नाही ते करून घ्यावे आणि प्रीमायसेस लायसेन्स ही काढून घ्यावे, असे नोटिसीद्वारे स्मरण केले आहे. मात्र, त्यांनी अद्यापही काहीच कार्यवाही केलेली नाही. नाट्यगृहात हजारो प्रेक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने आपण या दोन्ही व्यवस्थापनांना नोटिसीद्वारे कळविले आहे. त्यामुळे सोमवारचा शाहू स्मारक भवनातील प्रयोग रोखला आहे.
- कल्पना ढवळे,
जिल्हा करमणूक कर अधिकारी.

Web Title: The use of 'sugar-eaten man' was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.