ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंटचा प्रभावी वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:16+5:302021-07-17T04:20:16+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर आणखी कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि टीकाकरण (लसीकरण) या चतुःसूत्रीचा प्रभावी वापर ...
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर आणखी कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि टीकाकरण (लसीकरण) या चतुःसूत्रीचा प्रभावी वापर करा, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिल्या. जिल्ह्याला व्हेंटिलेटर, आरोग्यविषयक सुविधा आणि आणखी लस तसेच पूरबाधित होणाऱ्या १७१ गावांतील नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी, आरोग्य विभागाच्या सहायक संचालक डॉ. उज्ज्वला माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषा कुंभार उपस्थित होते.
मंत्री टोपे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात ७४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, ही कौतुकाची बाब आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अधिकाधिक नागरिकांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेऊन आरटीपीसीआर व अँटिजन तपासण्यांवर भर द्या. संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा. तिसऱ्या लाटेमधील धोका लक्षात घेऊन आरोग्य व्यवस्था सक्षम करा. कोरोनाबाबत जनजागृती होण्यासाठी नागरिकांचे 'माहिती, ज्ञान व संवाद' (आयईसी) वर भर द्या. जिल्ह्यातील नागरिकांच्या स्त्राव नमुन्यांची पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासणी होऊन लवकरात लवकर अहवाल मिळण्यासाठी प्रयत्न करू. आरोग्य विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी गतीने कार्यवाही करण्यात येत असून, जिल्हास्तरावरही अशीच कार्यवाही करावी.
आमदार प्रकाश आवाडे यांनी मनुष्यबळ, वैद्यकीय सेवा सुविधांबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी कोरोना सद्यस्थितीची माहिती दिली. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कोरोना नियंत्रणासाठी दंडात्मक कारवाई, कायदा व सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या असून, ७८ गावांतील ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण झाल्याचे सांगितले.
---
होम आयसोलेशन ॲपचा वापर करा
मंत्री टोपे म्हणाले, गृह अलगीकरणातील नागरिकांच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यासाठी 'होम आयसोलेशन ॲप' चा वापर करा. यासाठी स्वतंत्र 'कॉल सेंटर' सुरू करून यावर नियंत्रण ठेवा. उपचारात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे.
-----
- तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य व्यवस्था सक्षम करा
- खासगी डॉक्टरांनी मार्गदर्शक तत्त्वानुसार उपचार व नागरिकांच्या समुपदेशनावर भर द्यावा
-. व्हेंटिलेटर व ऑक्सिजनयुक्त पुरेसे बेड तयार करा
- प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवा
--
फोटो नं १६०७२०२१-कोल-टोपे कोरोना बैठक कलेक्टर ऑफीस
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आमदार प्रकाश आवाडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.