सांडपाण्याचा वापर शेतीसाठी : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:44 AM2018-07-02T00:44:07+5:302018-07-02T00:44:23+5:30
कोल्हापूर : ओढ्या-नाल्यांतून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे होणारे पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी व झाडांसाठी वापरता येऊ शकते, यासाठी आमदार अमल महाडिक यांनी पुढाकार घेऊन याचे काम आठवडाभरात सुरू करावे, याकरिता लागेल तो निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली.
वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागातर्फे यंदाच्या वृक्षलागवड मोहिमेचा प्रारंभ शेंडा पार्क येथे करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, पंचगंगा नदीप्रदूषणाची समस्या सुटण्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत. नाले व ओढ्यांमधील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळण्याचे प्रमाण कमी झाले तर हा प्रश्न बºयापैकी संपू शकतो. यामुळे या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी तसेच झाडांकरिता वापरावे, असे केल्यास झाडांना व शेतीला लागणाºया पाण्याचाही प्रश्न सुटेल.
पालकमंत्री पाटील म्हणाले, तज्ज्ञांच्या मते पर्यावरण संतुलनासाठी राज्यात किमान ४०० कोटी झाडे लावणे गरजेचे आहे. शासनाने पाच वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून या वृक्षांच्या संवर्धनासाठी संपूर्ण समाजाने सक्रिय योगदान देणे गरजेचे आहे. राज्यात पहिल्या वर्षी १ कोटी, दुसºया वर्षी २ कोटी, तिसºया वर्षी ४ कोटी आणि यंदा १३ कोटी वृक्षलागवड करण्यात येत आहे.
कृषी प्रक्रिया कारखानदारी उभी करा
तालुक्यात शेतकºयांनी कृषी उत्पादन वाढीबरोबरच कृषी प्रक्रिया कारखानदारी उभी करावी, त्यांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल,
अशी ग्वाही देत गावातील पालापाचोळ्यापासून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्पही उभारण्यात शेतकºयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.
१५ जून ते ३०
सप्टेंबरपर्यंत ‘वनमहोत्सव’
वन विभागातर्फे जिल्ह्यात १ कोटी २८ लाख रोपे तयार असून, ती १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करून जनतेला सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून दिली जातील.
१० जुलैपर्यंत ‘रोपे आपल्या दारी’ या योजनेतून शहरात ४ स्टॉल रोपे विक्रीसाठी सज्ज केल्याचेही अरविंद पाटील यांनी सांगितले.
यंदा २८ लाख ७१ हजार झाडे लावण्याचे नियोजन
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात
२८ लाख ७१ हजार झाडे लावण्याचे नियोजन असल्याचे सांगून लावण्यात येणारी झाडे ९५ ते १०० टक्क्यांपर्यंत जिवंत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
झाडांच्या संगोपनासाठी पाणी अन् ठिबक
शेंडा पार्क येथील झाडांचे संगोपन, पाणी आणि ठिबक यासाठी कृषी महाविद्यालयाने सविस्तर योजना तयार करावी, त्यांना शासन योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.