आवाडेंच्या भूमिकेमुळे ऊसदराची कोंडी फुटणार, उचलीबाबत उत्सुकता :3200 ची उचल शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 12:58 PM2017-11-03T12:58:38+5:302017-11-03T12:59:06+5:30
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी ऊसदराच्या आंदोलनात आम्ही खासदार राजू शेट्टी यांच्या समवेत असल्याचे जवाहर कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी समारंभात जाहीरपणे सांगितल्याने यंदाच्या पहिल्या उचलीचा तिढा तेच सोडविणार असल्याची शक्यता
कोल्हापूर : माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी ऊसदराच्या आंदोलनात आम्ही खासदार राजू शेट्टी यांच्या समवेत असल्याचे जवाहर कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी समारंभात जाहीरपणे सांगितल्याने यंदाच्या पहिल्या उचलीचा तिढा तेच सोडविणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आवाडे यांनी पहिली उचल जाहीर केल्यास इतर कारखान्यांनाही त्याप्रमाणे उचल द्यावी लागेल. आवाडे ती ३१०० की ३२०० रुपये जाहीर करतात हीच उत्सुकता आहे.
ऊसदराच्या आंदोलनात शेट्टी यांची सरकारकडून जेव्हा जेव्हा कोंडी केली गेली तेव्हा साखर कारखानदारच आंदोलनाची कोंडी फोडण्यात पुढे आले आहेत. यंदाही सरकारने एफआरपीएवढीच पहिली उचल देणार असल्याचे गुरुवारीच सहकार मंत्र्यांनी जाहीर केले आहे. ऊसदराचे श्रेय शेट्टी यांना मिळू नये असाच भाजप सरकारचा प्रयत्न आहे. त्यास आवाडे यांच्या भूमिकेमुळे शह बसणार आहे. यापूर्वी हुतात्मा कारखान्याचे नेते वैभव नायकवडी, दोन वेळा आवाडे, एकदा दिवंगत नेते सा.रे.पाटील व दिवंगत माजी खासदार सदा शिवराव मंडलिक यांनी अशीच पहिली उचल जाहीर करून आंदोलनाची कोंडी फोडली आहे.
शेट्टी व कल्लाप्पाण्णा आवाडे हे गेल्या लोकसभा निवडणूकीत एकमेकांच्याविरोधात निवडणूक लढले आहेत. परंतू त्यानंतर या दोन नेत्यांत सलोखा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत त्यांनी आघाडी केली होती. मध्यंतरी प्रकाश आवाडे हे भाजपमध्ये जाणार होते. परंतू त्यांना इचलकरंजीतून विरोध सुरु झाल्यावर शेट्टी यांनीच आवाडे यांना भाजपमध्ये जावू नका, आपण दोघे मिळून दबावगटाचे राजकारण करू असे सांगून राजकीय आधार दिला. त्यानुसार आवाडे यांनी भाजपचा नाद सोडला. शेट्टी यांनी पहिल्या उचलीबाबत घेतलेली भूमिका योग्य असल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितलेच शिवाय महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनाही एफआरपीवर हटून बसू नका असा सल्ला दिला. त्यामुळे आवाडे दोन दिवसांत पहिली उचल जाहीर करण्याची शक्यता आहे. ते नक्की किती रुपयाचा आकडा फोडतात याबध्दलच उत्सुकता आहे. त्यांनी एकदा उचल जाहीर केली की अन्य कारखान्यांच्याही उचलीचे आकडे जाहीर होतील.