व्ही. एन. शिंदे, अनुप जत्राटकर यांना राज्य वाङ्मय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 12:42 PM2021-01-29T12:42:28+5:302021-01-29T12:45:08+5:30
literature Kolhapur- शिवाजी विद्यापीठातील उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाला राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले पुरस्कार, तर लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिका संग्रहास विजय तेंडुलकर पुरस्कार जाहीर झाला. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून या पुरस्कारांची घोषणा झाली.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाला राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले पुरस्कार, तर लेखक, दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांच्या निष्पर्ण पिंपळाच्या छायेत या एकांकिका संग्रहास विजय तेंडुलकर पुरस्कार जाहीर झाला. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून या पुरस्कारांची घोषणा झाली.
राज्य शासनातर्फे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान केले जातात. या अंतर्गत सन २०१९ या वर्षासाठी डॉ. शिंदे यांच्या पुस्तकाला प्रौढ वाङ्मय-विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) या विभागातील पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये आहे. डॉ. शिंदे यांनी सन २०१९ मध्ये आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया हे पुस्तक लिहिले. त्यात आवर्त सारणीतील सर्व ११८ मूलद्रव्यांची माहिती आणि आवर्त सारणीचा इतिहास उलगडून मांडला आहे.
लेखक-दिग्दर्शक जत्राटकर यांना प्रथम प्रकाशन (नाटक/ एकांकिका) विभागातून पुरस्कार जाहीर झाला. त्याची रक्कम ५० हजार रुपये आहे. जत्राटकर यांचा हा पहिला एकांकिका संग्रह असून त्यातील एकांकिकांचे प्रयोग विविध स्पर्धांतून सादर झाले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून यंदा पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र हे साहित्यिकांना घरपोच प्रदान होणार असून पुरस्काराची रक्कम त्यांच्या बँकखात्यावर हस्तांतरित केली जाणार आहे.
लोकमतमुळे पुस्तक साकारले
लोकमतमधील विज्ञान सदरातील धन्यवाद मेंडलीव या एका लेखाच्या माध्यमातून हे ४३६ पानांचे पुस्तक लिहिण्याचे बीज माझ्यामध्ये रुजले. त्यासह विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या जिज्ञासेचा त्यात मोठा भाग आहे. यापुढेही लिहीत राहण्यासाठी हा पुरस्कार ऊर्जा देणारा असल्याची प्रतिक्रिया डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली.