corona virus-विद्यार्थ्यांना सुट्टी, शिक्षक, कर्मचाऱ्यांना ड्युटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 03:43 PM2020-03-17T15:43:14+5:302020-03-17T15:46:38+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याअंतर्गत उपाययोजना म्हणून शासनाच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयांतील वर्ग दि. ३१ मार्चपर्यंत भरणार नाहीत. मात्र, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली.
कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याअंतर्गत उपाययोजना म्हणून शासनाच्या आदेशानुसार शाळा, महाविद्यालयांतील वर्ग दि. ३१ मार्चपर्यंत भरणार नाहीत. मात्र, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सोमवारपासून झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी मिळाली.
दोन दिवसांपूर्वीच याबाबतची सूचना विद्यार्थी, पालकांना शाळा, महाविद्यालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली होती. वर्ग भरले नसल्याने नेहमी गजबजलेल्या शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात सोमवारी शुकशुकाट पसरला होता.
दहावी आणि बारावीचे पेपर असणाऱ्या परीक्षा केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांत परीक्षार्थी दिसून आले. वार्षिक नोंदी करणे, चाचणी परीक्षा आणि दहावी, बारावीच्या झालेल्या पेपरची तपासणी, हजेरीपत्रक पूर्ण करणे, आदी स्वरूपातील कामे शिक्षकांकडून सुरू होती. स्वच्छतेसह अन्य स्वरूपातील कामे शिक्षकेतर कर्मचारी करत होते.
दि. २७ मार्चपासून विद्यापीठाच्यावतीने परीक्षा होणार आहेत. त्याच्यासाठी ग्रंथालय, अभ्यासिकांमध्ये काही विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली. खासगी क्लासेसदेखील भरले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णत: सुट्टी मिळाली.
गल्लींमध्ये क्रिकेट, फुटबॉल रंगला
सुट्टी असल्याने गल्ली, कॉलनीतील रस्त्यांवर विद्यार्थ्यांचे क्रिकेट, फुटबॉल, आदी खेळ रंगले. मात्र, पालकांमध्ये कोरोनाबाबतची धास्ती आहे. त्यामुळे ते आपल्या पाल्यांना खेळण्यासाठी जाताना मास्क वापरण्याचे बंधनकारक करीत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी मुले, मुली या मास्क घालून वावरत असल्याचे दिसून आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्गांना सुट्टी देण्याचा चांगला निर्णय शासनाने घेतला आहे. कर्नाटक सरकारने वार्षिक परीक्षा घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसा विचार आपल्या शासनाने करावा. त्यासाठी सहामाही परीक्षा, अन्य चाचणींच्या आधारावर वार्षिक गुणदान करण्याचा विचार करावा.
- संतोष आयरे,
प्राथमिक शिक्षक
कोरोनाबाबतची सध्याची स्थिती लक्षात घेता वर्ग भरत नाहीत हे योग्य आहे. परीक्षा तोंडावर आल्या आहेत. ते लक्षात घेता विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये काही अडचण आल्यास शिक्षकांनी मोबाईलच्या माध्यमातून त्याचे निराकरण करावे.
- अमृत खुपेरकर,
महाविद्यालयीन विद्यार्थी
निवासी शाळा सुरूच
जिल्ह्यातील प्राथमिक शाळा ते महाविद्यालयांतील वर्ग दि. ३१ मार्चंपर्यंत भरणार नाहीत. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली. मात्र, जिल्ह्यातील काही निवासी शाळा अद्याप सुरूच आहेत. त्याबाबत असा निर्णय होणे आवश्यक आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- प्राथमिक शाळा : ३७०४ (विद्यार्थी : ६,९४,७१२)
- माध्यमिक शाळा : ८६८ (विद्यार्थी : ४,०८,९७१)
- उच्च माध्यमिक शाळा : २६२
- इंग्रजी माध्यमाच्या शाळा : सुमारे ५००
- कोल्हापूर महानगरपालिका शाळा : ५९
- खासगी क्लासेस : सुमारे ५०० (विद्यार्थी : १० हजार)