Corona vaccine Kolhapur : १८ वर्षांवरील ४२०० जणांना रोज लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 08:16 PM2021-08-04T20:16:12+5:302021-08-04T20:18:55+5:30
Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटांतील रोज ४ हजार २०० जणांना शुक्रवार (दि. ६) ऑगस्टपासून रोज लस देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि आरोग्य समितीच्या सभापती वंदना जाधव यांनी ही माहिती दिली. यासाठी जिल्ह्यातील २१ आरोग्य संस्थांमध्ये सोय करण्यात आली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील १८ ते ४४ वयोगटांतील रोज ४ हजार २०० जणांना शुक्रवार (दि. ६) ऑगस्टपासून रोज लस देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि आरोग्य समितीच्या सभापती वंदना जाधव यांनी ही माहिती दिली. यासाठी जिल्ह्यातील २१ आरोग्य संस्थांमध्ये सोय करण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यातील १८ लाख ४१ हजार २०४ नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक, आरोग्य कर्मचारी, कोरोना काळात पुढाकार घेऊन काम करणारे कर्मचारी यांचा यामध्ये समावेश आहे. १८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु, मुबलक प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने पहिला डोस केवळ ४ टक्के आणि दुसरा डोस केवळ १९ टक्के नागरिकांना देण्यात आला आहे. ४५ ते ५९ या वयोगटांमध्ये राज्यात सर्वाधिक लसीकरण हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे.
आता दुसऱ्या डोससाठी पात्र नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार असले तरी दुसऱ्या बाजूला १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २१ आरोग्यसंस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. रोज प्रत्येक ठिकाणी २०० याप्रमाणे ४२०० नागरिकांना लसीकरण केले जाईल. दुसऱ्या डोससाठी नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग अजूनही संपलेला नाही. तेव्हा वेळेत दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे.
या ठिकाणी होईल लसीकरण
ग्रामीण रुग्णालय आजरा, भुदरगड, चंदगड, नेसरी, हातकणंगले, पारगाव, कागल, मुरगूड, खुपिरे, मलकापूर, शिरोळ, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, गांधीनगर, कोडोली, प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे, तारळे, कळे, वाळवा, भेडसगाव, जयसिंगपूर आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लालनगर इचलकरंजी
संध्याकाळी चार वाजता नोंदणीसाठी स्लॉट खुला केला जाईल. त्यावेळी कोविन पोर्टल किंवा आरोग्यसेतू ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक केंद्रावर ९ ते ५ या वेळेत २०० जणांना लस दिली जाईल. कोणत्याही परिस्थितीत नोंदणी न केलेल्यांना लस दिली जाणार नसल्याने केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
दुसऱ्या डोससाठी अडीच लाख नागरिक पात्र
पहिला डोस घेतल्यानंतर आता दुसऱ्या डोससाठी अडीच लाख नागरिक पात्र आहेत. त्यामुळे प्राधान्याने दुसऱ्या डोस आवश्यक असणाऱ्या नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या लस पुरेशा प्रमाणात येत असून, नागरिकांनी मोबाईलवर आलेल्या संदेशानुसार त्या त्या ठिकाणी जाऊन आपला डोस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.