शाहूवाडी तालुक्यात १२ हजार ४७२ नागरिकांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:25 AM2021-03-23T04:25:45+5:302021-03-23T04:25:45+5:30
सरूड : शाहूवाडी तालुक्यात रविवार, २१ मार्च अखेर १२ हजार ४७२ नागरिकांना कोविड-१९ या ...
सरूड : शाहूवाडी तालुक्यात रविवार, २१ मार्च अखेर १२ हजार ४७२ नागरिकांना कोविड-१९ या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे लसीकरण करण्यात आले आहे. यातील ७१४ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे . या मोहिमेंतर्गत तालुक्यातील एकूण ३४ हजार ५१६ नागरिकांना लसीकरण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात ३४ टक्के लसीकरण झाले आहे . लसीकरणाची आकडेवारी पाहता शाहूवाडी तालुक्यात या लसीकरण मोहिमेस गती आली आहे.
शाहूवाडी तालुक्यात सुरुवातीस या लसीकरण मोहिमेस नागरिकांतून थंडा प्रतिसाद मिळाला; परंतु जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी १० मार्च रोजी शाहूवाडी तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रांना भेटी देऊन या मोहिमेचा आढावा घेतला व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त, तसेच ६० वर्षांपुढील एकही पुरुष व महिला या लसीकरणापासून वंचित राहु नये, यासाठी ही मोहीम गतीने राबविण्याच्या सक्त सूचना आरोग्य विभागास दिल्या. त्यानंतर या लसीकरण मोहिमेसंदर्भात आरोग्य विभाग, तसेच स्थानिक प्रशासनाने गावागावातील नागरिकांमध्ये जनजागृती करून ही लस घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले, त्यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर नागरिकांचा ओघ वाढला आहे. तालुक्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी तालुका प्रशासनाने योग्य नियोजन केले असून, त्यादृष्टीने तहसीलदार गुरु बिराजदार, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक , प्राथमिक शिक्षक, गाव कामगार तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रा. पं. कर्मचारी आदी एकत्रितरीत्या या मोहिमेत कार्यरत आहेत .