रुकडीत बौद्ध समाजाच्यावतीने लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:23 AM2021-05-01T04:23:45+5:302021-05-01T04:23:45+5:30
रुकडी गावात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने येथील प्राथमिक आरोग्य पथक व ग्रामपंचायत प्रशासन कोरोना दक्षता समिती विशेष उपाययोजना करण्यासाठी ...
रुकडी गावात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने येथील प्राथमिक आरोग्य पथक व ग्रामपंचायत प्रशासन कोरोना दक्षता समिती विशेष उपाययोजना करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक अंतर ठेवून व गर्दी टाळून शिस्तबद्धरीत्या लसीकरण करता यावे यासाठी बौद्ध समाज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये स्वतंत्र लसीकरण केंद्र तयार करून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, या लसीकरण केंद्राचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तांबोळी व पंचायत समितीचे सदस्य पिंटू ऊर्फ लक्ष्मण मुरुमकर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, यावेळी ४५ वर्षांवरील ५१ महिला व ९ पुरुष अशा एकूण ६० व्यक्तींना लस देण्यात आली. हे विशेष स्वतंत्र केंद्र लस पुरवठ्यानुसार दररोज सकाळी १० ते २ या वेळेपर्यंत येथे सुरू राहणार आहे. याप्रसंगी डॉ. तांबोळी, पंचायत समितीचे सदस्य पिंटू मुरुमकर, बौद्ध समाज अध्यक्ष रमेश कांबळे, पोलीस पाटील कविता कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष रुकडीकर, सोमनाथ कांबळे, बौद्ध पंचायत सदस्य दिलीप कांबळे, जे. के. गायकवाड, चंद्रकांत कांबळे, प्रा. देवानंद कांबळे, जगन्नाथ कांबळे, राजेंद्र भोसले, सतीश कांबळे, संजय कांबळे, तसेच आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.