शाळा, महाविद्यालयातच आता लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 01:26 PM2021-12-31T13:26:22+5:302021-12-31T13:39:04+5:30
राज्य सरकारकडून आलेल्या निर्देशानुसार शहरात १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण मोहीम राबविण्याची तयारी पूर्ण झाली आहे
कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी दि. ३ जानेवारीपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून शहरातील १३३ शाळा व महाविद्यालयात जाऊन २८ हजार ८९६ मुलांना ही लस दिली जाईल, अशी माहिती प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी पत्रकारांनी सांगितली.
राज्य सरकारकडून आलेल्या निर्देशानुसार शहरात १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण मोहीम राबविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे २९ हजार ८९६ इतकी लाभार्थ्यांची संख्या आहे. या सर्वांना नियमित लसीकरण केंद्रावर येण्यास सांगण्यात येणार नाही. त्यांच्यासाठी शाळा, महाविद्यालयातच लसीकरण केली जाईल.
सर्वच मुलांना कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे. या वयोगटातील शाळाबाह्य मुले असतील तर त्यांना त्यांच्या नजीकच्या घराजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस दिली जाईल. ज्या शाळेत अथवा महाविद्यालयात पटसंख्या जास्त आहे, अशांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे.
लसीकरणासाठी महापालिका प्रशासनाने प्रत्येक शाळा व महाविद्यालयाला एक नोडल अधिकारी नियुक्त केला आहे. या अधिकाऱ्यावर संबंधित शाळा, महाविद्यालयाशी संपर्क साधून लसीकरण शिबीराचे नियोजन करायची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या लसीकरणासाठी अकरा पथके नियुक्त करण्यात आली आहेत. लसीकरणाच्या ठिकाणीच नोंदणी केली जाणार आहे.
ज्येष्ठांना बुस्टर डोस
शहरातील साठ वर्षांवरील ६८ हजार ७०० ज्येष्ठ नागरिकांना तर ३० हजार ५५ हेल्थ केअर तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना दि. १० जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यात येणार आहेत. दुसरा डोस घेऊन ज्यांना नऊ महिने पूर्ण झाली आहेत, असे लाभार्थी बुस्टर डोस घेण्यास पात्र ठरतील, असे बलकवडे यांनी सांगितले.