लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला, शहरात २९९ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:19 AM2021-05-28T04:19:17+5:302021-05-28T04:19:17+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येत असल्यामुळे कोल्हापूर शहरात ...
कोल्हापूर : राज्य सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येत असल्यामुळे कोल्हापूर शहरात लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे एकीकडे लस उपलब्ध आहे आणि दुसरीकडे क्षमतेइतके लाभार्थी मिळत नाहीत.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने शहरात लसीकरणाकरिता अकरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतून सोय केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या केंद्रांवर लस घेण्याकरिता नागरिकांची प्रचंड गर्दी उसळलेली असायची. भर उन्हात तीन-चार तास नागरिकांच्या रांगा लागलेल्या असायच्या. त्यावेळी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस २८ दिवसांनी दिला जायचा. त्यानंतर ही कालमर्यादा ५४ दिवसांपर्यंत वाढविण्यात आली. आता तर ती ८४ दिवसांपर्यंत वाढविली आहे. पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झाल्यानंतरच दुसरा डोस दिला जात आहे. पहिला डोस देणे थांबविण्यात आले आहे.
त्यामुळे साहजिकच या नवीन नियमामुळे लसीकरण केंद्रांवरील रांगा कमी झालेल्या पाहायला मिळत आहेत. ज्यांचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना लसीकरण केंद्रातून फोन केले जातात. त्यानुसार नागरिक केंद्रावर जाऊन लस घेतात. सध्या केंद्रांवर गर्दी कमी दिसत असली तरी, पुढील महिन्यात मात्र ती वाढलेली असेल. तेव्हा रोज किमान अडीच ते तीन हजार डोस लागतील.
शहरामध्ये गुरुवारी तीन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रे तसेच सीपीआर रुग्णालय येथे २९९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे ३३, फिरंगाई येथे ७, सदरबाजार येथे २५० व सीपीआर हॉस्पिटल येथे ९ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत शहरात एक लाख १४ हजार १९३ नागरिकांना पहिल्या डोसचे, तर ४० हजार ५७६ नागरिकाना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.