माणसांचे लसीकरण लांबले अन् जनावरांचेही लटकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:21 AM2021-05-17T04:21:24+5:302021-05-17T04:21:24+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना लसीकरण लांबलेले असतानाच आता जनावरांच्या लसीकरणाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी ...
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना लसीकरण लांबलेले असतानाच आता जनावरांच्या लसीकरणाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी मे-जूनमध्ये घटसर्प, फऱ्या आदीसाठी राज्य शासनाच्या वतीने लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाते. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनची परिस्थिती पाहता जनावरांचे लसीकरणही लटकण्याची भीती पशुपालकांमध्ये आहे.
हवामान बदलामुळे माणसांचे आरोग्य बिघडते, त्याप्रमाणेच वातावरण बदलाचा फटका जनावरांनाही बसतो. पावसाळ्यापूर्वी ऑक्टोबर -नोव्हेंबर व मे-जूनमध्ये लसीकरण केले जाते. पावसाळ्यात हिरव्या चाऱ्यातून जनावरांना घटसर्प, फऱ्या आदी रोगांची लागण मोठ्या प्रमाणात होते. या आजारात जनावरांना ताप येणे, तोंडात फोड येणे, पायात जखमा होणे आदी त्रास होतो. वेळीच उपचार झाला नाही तर जनावरे दगावण्याची शक्यता अधिक असते. यासाठी राज्य शासनाच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना लसीकरण केले जाते. गाय व म्हैस वर्गीय, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्यांनाही लसीकरण दिले जाते. साधारणत: महिन्याभरात ते पूर्ण करणे अपेक्षित असते.
मागील वर्षापासून कोरोना व लॉकडाऊनमुळे लसीकरणात काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. अत्यावश्यक सेवा असली तरी कोरोनाचा संसर्ग वाढत असताना गोठ्यात जाणे जोखमीचे असते. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आठ दिवसांचे कडक लॉकडाऊन केले आहे. कोरोनाचे रुग्ण अटोक्यात आले नाही तर लॉकडाऊन आणखी आठ दिवस वाढण्याची शक्यताही आहे. त्यामुळे जनावरांचे लसीकरण लटकण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील पशुधन असे
म्हैस व गाय वर्ग - ८ लाख ८८ हजार १११
शेळ्यामेंढ्या - २ लाख ६८ हजार
कोंबड्या (गावठी)- १५ लाख
ब्रॉयलर कोंबड्या - ३३ लाख
नोव्हेंबरमध्ये ५० टक्केच लसीकरण
कोरोनाचे सावट, पशुसंवर्धन विभागाची तोकडी यंत्रणा यामुळे नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात केवळ ४ लाख ४५ हजार (५० टक्के) जनावरांना लसीकरण झाले. खासगी पशुवैद्यक व गोकूळ दूध संघाच्या यंत्रणेच्या माध्यमातून लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्याचा पशुसंवर्धन विभागाचा प्रयत्न असतो.
कोट-
दुभत्या जनावरांच्या किमती लाखाच्या घरात गेल्या आहेत, त्यामुळे एखादे जनावर दगावले तर संसाराचा कणाच मोडतो. यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून पशुसंवर्धन विभागाने त्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा.
- संग्राम पाटील (पशुपालक, म्हाळुंगे)
कोरोनाने अनेक गावे बाधित असल्याने लसीकरणाला अडचणी येऊ शकतात, असे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. तरीही सर्वांच्या सहकार्याने लसीकरणाची शंभर टक्के मोहीम राबवली जाईल.
- डॉ. वाय. ए. पठाण (उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग कोल्हापूर)