महापालिकेची लसीकरणात वशिलेबाजी...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:26 AM2021-05-21T04:26:08+5:302021-05-21T04:26:08+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात वशिलेबाजीने लसीकरण होत असल्याच्या तक्रारी आहेत. सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण मोहीम बंद ठेवली ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयात वशिलेबाजीने लसीकरण होत असल्याच्या तक्रारी आहेत. सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण मोहीम बंद ठेवली गेल्याचा खुलासा करण्यात येत असताना वशिलेबाजीने लसीकरण कसे केले जाते, अशी विचारणा केली जात आहे.
महानगरपालिका प्रशासनास गेल्या पाच- सहा दिवसांपासून कोविशिल्ड लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे कोविशिल्डचे पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्णपणे बंद आहे. तसेच राज्य सरकारच्या सूचनेनुसार १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविण्यात आले आहे. तरीही बुधवारी आयसोलेशन रुग्णालयात कदमवाडी परिसरातील एका ३६ वर्षीय व्यक्तीला कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला.
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबविण्यात आले आहे, लस नसल्याने कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस सध्या दिला जात नाही. मग बुधवारी या व्यक्तीला कशी काय लस दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासन एकीकडे सामान्य नागरिकांना लस नसल्याचे सांगत असताना अशा व्यक्तींना लस दिली जाते याचा अर्थ लसीकरणात वशिलेबाजी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रोज तीस चाळीस व्यक्तींना अशी चोरून लसीकरण केले जात असल्याचा संशय आहे.
याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की, सध्या संजीवनी अभियान राबविले जात असून त्या कामासाठी शिक्षकांना सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे त्यांना फ्रंटलाइन वर्करमधून प्राधान्याने लस दिली जात आहे; परंतु वशिलेबाजी अथवा नियम डावलून लसीकरण केले जात नाही.