हुपरी आरोग्य केंद्रात लसीकरणाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:24 AM2021-05-10T04:24:56+5:302021-05-10T04:24:56+5:30
लोकमत इफेक्ट हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक केंद्रातील ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण मोहिमेचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. योग्य ...
लोकमत इफेक्ट
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक केंद्रातील ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण मोहिमेचा पूर्णपणे फज्जा उडाला होता. योग्य नियोजनाच्या अभावामुळे केंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने हे प्राथमिक आरोग्य केंद्र कोरोना स्प्रेडर केंद्र बनण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. याबाबतचे वृत्त शनिवारी (ता. ८) ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच नगर परिषद व आरोग्य केंद्रातील यंत्रणा जागी झाली आहे. आज (सोमवारी) दुसरा डोस देण्यात येणाऱ्या शंभर लाभार्थ्यांची यादी रविवारी रात्री फलकावर लावली असून, सोशल मीडियावरसुद्धा प्रसिद्ध केली आहे.
केवळ ‘लोकमत’च्या वृत्तामुळे झालेल्या या बदलामुळे लसीकरण मोहिमेला सुरळीतपणा आला असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लस मिळावी, यासाठी अगदी पहाटेपासून नागरिक येथील आरोग्य केंद्राच्या आवारात मोठ्या संख्येने येऊन बसतात. याठिकाणी योग्य प्रकारचे नियोजन नसल्याने तसेच इच्छुकांची अगोदर नोंदणी करण्यात येत नसल्याने येथे सगळा सावळा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अशाप्रकारच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रसंगी वादावादीचेही प्रसंग घडत होते. आरोग्य केंद्राच्या आवारात जमा होणाऱ्या गर्दीमुळे हे आरोग्य केंद्रच आता कोरोना हॉटस्पॉट बनण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. याबाबतचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. सोशल मीडियावरही याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. त्यामुळे नगर परिषद व आरोग्य केंद्रातील प्रशासनाने याची वेळीच दखल घेऊन उद्या (सोमवार)पासून प्रत्यक्षात बदल करण्यासाठी पाऊल उचलले आहे.