लसीकरण : ज्येष्ठांचं भागेना, तरुणांना मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:04+5:302021-06-16T04:31:04+5:30
भारत चव्हाण, कोल्हापूर : महानगरपालिकेकडे कोरोना प्रतिबंधात्मक लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण काही केल्या संपता ...
भारत चव्हाण, कोल्हापूर : महानगरपालिकेकडे कोरोना प्रतिबंधात्मक लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण काही केल्या संपता संपत नाही, तर गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना लस मिळता मिळेना झाले आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग कायम असताना लस घेण्याबाबत प्रचंड जागरूकता निर्माण झाली असताना दुसरीकडे लस मिळत नाही, याबाबत शहरात नाराजीचा सूर उमटत आहे.
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर महानगरपालिका लसीकरण मोहीम राबवित आहे. शहरात अकरा केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. राज्य शासनाकडून तीन-चार दिवसांतून एकदा १२०० ते १५०० डोस उपलब्ध होत आहेत. लोकसंखेच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प असल्याने लसीकरणाचा वेग फारच कमी आहे. त्यामुळे ‘ज्येष्ठांचे भागेना आणि तरुणांना मिळेना’ अशी विचित्र परिस्थिती शहरात आहे.
१) शहरात सर्वात कमी लसीरण झालेली केंद्रे -
केंद्राचे नाव आतापर्यंत लसीकरण
अ. सिद्धार्थनगर ८ हजार ३७८
ब. कसबा बावडा ८ हजार १९२
क. फुलेवाडी ८ हजार ९४९
ड. मोरे-मानेनगर १० हजार ७७६
२) शहरात सर्वांत जास्त लसीरण झालेली केंद्रे
केंद्राचे नाव आतापर्यंत लसीकरण
अ. सदर बाजार १५ हजार ६१२
ब. फिरंगाई १४ हजार ५३०
क. राजारामपुरी १४ हजार ५२८
ड. सावित्रीबाई फुले १३ हजार ५३५
-लसीकरण कमी होण्याचे कारण -
महानगरपालिकेला मुबलक लस उपलब्ध होत नाही. तीन-चार दिवसांतून एकदा साधारणपणे १२०० ते १५०० डोस मिळतात. लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण फारच अत्यल्प आहे. त्यामुळे लसीकरण कमी होताना दिसते. पालिका प्रशासनाकडून लसींची मागणी होते; परंतु पुरवठा करणे हे राज्य सरकारच्या हातात आहे. त्यामुळे मागणी केल्यानंतरसुद्धा लस मिळेलच असे खात्रीशीर सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून लसीकरण केंद्रांतूनच नागरिकांना फोन करून बोलावून घेतले जात आहे. अन्य नागरिकांना केंद्रावर येऊ नका, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
- कोल्हापुरात ३५ टक्के लसीकरण -
आतापर्यंत पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी २६ टक्के इतकी तर, दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी ३५ टक्के इतकी आहे. लसीकरण कमी होऊनही कोल्हापूर जिल्हा राज्यातील लसीकरणात आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. जेवढी लस जिल्ह्याला उपलब्ध होईल ती लोकसंख्येच्या आधारावर वाटप केली जाते. १८ ते ४५ वयोगटातील २९५१ नागरिकांना पहिला डोस तर, ७६७ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
प्रशासनाची अशीही तत्परता -
महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम राबवून शहरातील ७२१ दिव्यांग व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला. ५१ बेघर व्यक्तींना तर, परदेशात शिक्षणाकरिता जाणाऱ्या १५९ विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. विशेषत: दिव्यांग आणि बेघरांकरिता प्रशासनाने विशेष तत्परता दाखविली.
-पाइंटर्स -
शहराची लोकसंख्या किती- पाच लाख ६२ हजार २३१
किती लोकांनी दुसरा डोस घेतला - ४३ हजार ३९१
किती लोकांना पहिला डोस घेतला- १ लाख २३ हजार ०८९
कोट -
लसीकरण मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी आमची यंत्रणा तयार आहे; परंतु डोस कमी मिळत असल्याने त्यातूनही आम्ही प्राधान्यक्रम ठरवून ज्येष्ठांचे लसीकरण करत आहोत. बेघर, दिव्यांग, परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस देत आहोत.
डॉ. अमोलकुमार माने, लसीकरण अधिकारी