कोल्हापूर जिल्ह्यात १२० आरोग्य केंद्रे, खासगी रुग्णालयात लसीकरण सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 07:35 PM2021-03-02T19:35:49+5:302021-03-02T19:37:02+5:30
Corona vaccine Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून याअंतर्गत ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त, ६० वर्षांवरील ज्येष्ठ असे ६ लाख ६१ हजार ९८४ नागरिकांना व आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर असे एकूण साडे सात लाख लोकांना १२० आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयातून लस देण्यात येणार आहे. त्यासाठी या नागरिकांनी कोवीन ॲपद्वारे नाव नोंदणी करावी, व प्रशासनाच्या नियोजनानुसार टप्प्याटप्याने लस घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असून याअंतर्गत ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त, ६० वर्षांवरील ज्येष्ठ असे ६ लाख ६१ हजार ९८४ नागरिकांना व आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर असे एकूण साडे सात लाख लोकांना १२० आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयातून लस देण्यात येणार आहे. त्यासाठी या नागरिकांनी कोवीन ॲपद्वारे नाव नोंदणी करावी, व प्रशासनाच्या नियोजनानुसार टप्प्याटप्याने लस घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील नियोजनाबाबत आयोजित बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, शल्यचिकित्सक अनिल माळी, शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. माळी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना काळात प्रशासनाने आयुष सर्व्हे केला होता त्यानुसार व्याधीग्रस्त व ज्येष्ठांची आकडेवारी उपलब्ध झाली असून सर्व यादी आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी यांना देण्यात येणार आहे, ते घरोघरी जावून ज्येष्ठांच्या ऑनलाईन बुकींगसाठी मदत करतील. ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, शिक्षक, कोतवाल व ग्रामपंचायत कर्मचारी जनजागृती करतील. प्रत्यक्ष केंद्रावर जावून देखील लसीकरण करता येईल मात्र गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी आधी ऑनलाईन नोंदणी करावी.