जिल्ह्यातील सहा रुग्णालयांमध्ये लस पोहोचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:21 AM2021-01-15T04:21:31+5:302021-01-15T04:21:31+5:30
कोल्हापूर : शहर वगळता जिल्ह्यातील सहा रुग्णालयांमध्ये गुरुवारी संध्याकाळपर्यंत लस पोहोचवण्यात आली. आज कोल्हापूर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लस पोहोच करण्यात ...
कोल्हापूर : शहर वगळता जिल्ह्यातील सहा रुग्णालयांमध्ये गुरुवारी संध्याकाळपर्यंत लस पोहोचवण्यात आली. आज कोल्हापूर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लस पोहोच करण्यात येणार आहे. निश्चित केलेल्या १४ पैकी पुन्हा ३ लसीकरण केंद्रे रद्द करण्यात आली असून, आता शनिवारी केवळ ११ रुग्णालयांमध्ये लसीकरण होणार आहे.
सुरुवातीच्या नियोजनाप्रमाणे जिल्ह्यात २० ठिकाणी लसीकरण करण्यात येणार होते. परंतु, राज्य पातळीवरून यातील सहा केंद्रे रद्द करण्यात आली. त्यानुसार १४ ठिकाणी लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, त्यातील महापालिकेचे कसबा बावडा नागरी आरोग्य केंद्र, गांधीनगर उपजिल्हा रुग्णालय आणि कोडोली उपजिल्हा रुग्णालय ही तीन केंद्रे रद्द करण्यात आली आहेत.
त्यामुळे आता राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सीपीआर कोल्हापूर, आयजीएम रुग्णालय इचलकरंजी, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, सेवा रुग्णालय कसबा बावडा, कागल ग्रामीण रुग्णालय आणि शिरोळ ग्रामीण रुग्णालय या सहा ठिकाणी लसीकरण होईल, तर कोल्हापूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील महाडिक माळ, सदर बाजार नागरी आरोग्य केंद्र, सावित्रीबाई फुले रुग्णालय, पंचगंगा रुग्णालय शुक्रवार पेठ आणि राजारामपुरी नागरी आरोग्य केंद्र या पाच ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.
चौकट
केवळ एका दिवसासाठीच
ही लसीकरण मोहीम केवळ शनिवार, दि. १६ जानेवारी रोजी एका दिवसासाठी राबवण्यात येणार आहे. सुरुवातीला ड्राय रन, नंतर आता कमी प्रमाणात लसीकरण केल्यानंतर अंतिम लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.