टीकेचा रोख ‘सावध’च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:02 AM2019-04-04T01:02:03+5:302019-04-04T01:02:08+5:30
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत; ...
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत; पण उमेदवारांसह प्रमुख नेत्यांच्या टीकेचा रोख पाहिला तर तो सावधच दिसत आहे. राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर चुकूनही टीका करीत नाहीत; तर शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या नेत्यांऐवजी धनंजय महाडिक यांच्यावर शरसंधान साधत आहेत. त्याशिवाय दोन्ही कॉँग्रेस, युतीचे आजी-माजी आमदारांच्या टीकेचा रोखही तसाच आहे. आता जहरी टीका केली तर विधानसभेचे गणित बिघडू शकते, याची जाणीव असल्याने सोईनुसारच टीकाटिप्पणी सुरू आहे. नेत्यांच्या बचावात्मक प्रचारयंत्रणेने कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत दिसत आहेत.
कोल्हापुरात लोकसभेचे दोन मतदारसंघ असले तरी खरी रंगत ही कोल्हापूर मतदारसंघात पाहावयास मिळत आहे. येथे महाडिक आणि मंडलिक यांच्यात सरळ लढत होत असली तरी आघाडी आणि युतीअंतर्गत साट्यालोट्यांमुळे येथे चांगलेच त्रांगडे निर्माण झाले आहे. युतीतील काही घटकपक्षांची आघाडीच्या उमेदवाराला, तर आघाडीतील काही पक्षांची युतीच्या उमेदवाराला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होणार असल्याने टीका करताना थोडी सावध भूमिका घेतली जात आहे.
देशाची निवडणूक असल्याने केंद्रीय नेतृत्वाच्या कारभारापासून उमेदवारांपर्यंत एकमेकांचे वाभाडे काढले जातात. राज्यातील अनेक मतदारसंघांत आपण ते पाहतो; पण कोल्हापुरात जरा परिस्थिती वेगळी आहे. युतीचे उमेदवार संजय मंडलिक हे केवळ महाडिक यांच्यावरच टीका करतात. कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची उघड, तर राष्टÑवादीतून काही छुपी मदत होणार असल्याने ते चुकूनही दोन्ही कॉँग्रेसवर टीका करीत नाहीत. धनंजय महाडिक यांनी कितीही चुका केल्या तरी त्यांना शिक्षा करणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अगोदरच स्पष्ट करून आपली मदत कोणाला होणार याचे संकेत दिले होते. आता मंत्री पाटील दोन्ही कॉँग्रेसविरोधात जोरदार हल्ला चढवीत आहेत; पण ते महाडिक यांच्यावर एकदाही टीका करीत नाहीत. साहजिकच महाडिकसुद्धा भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत नाहीत.
दोन्ही उमेदवारांचे समर्थक नेतेही टीकाटिप्पणी करताना सावधच आहेत. विधानसभा निवडणुकीतील राजकीय गणित पाहूनच कोणाविरोधात आक्रमक व्हायचे आणि कोणाला सॉफ्ट कॉर्नर द्यायचा हे ठरवूनच प्रचार यंत्रणेत सक्रिय दिसत आहेत.
हसन मुश्रीफ हे भाजप आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शरसंधान साधत आहेत; पण ते संजय मंडलिक यांच्यावर चुकूनही टीका करताना दिसत नाहीत. चंद्रदीप नरके यांचे पी. एन. पाटील हे विरोधक आहेत. त्यांना विधानसभेला ‘गोकुळ’च्या सत्तेचा मोठा त्रास होत असल्याने ते लोकसभेच्या प्रचारात ‘गोकुळ’च्या आडून पी. एन. पाटील आणि महाडिक यांना लक्ष्य करीत आहेत. पी. एन. पाटील यांच्या टीकेचा सारा रोख शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावरच दिसतो.
सतेज पाटील यांचे महाडिक हेच लक्ष्य असल्याने ते त्यावरच वार करीत आहेत. राजेश क्षीरसागर यांचे सत्यजित कदम हे विधानसभेचे प्रतिस्पर्धी असल्याने त्यांनी महाडिक यांना लक्ष केले आहे;
पण ते दोन्ही कॉँग्रेसबाबत चकार
शब्दही काढत नाहीत. या नेत्यांच्या टीकाटिप्पणी विधानसभेचे गणित पाहूनच होत असून बचावात्मक पवित्र्याने कार्यकर्त्यांत मात्र संभ्रमावस्था पसरली आहे.
प्रमुख नेत्यांच्या टीकेचा रोख
चंद्रकांत पाटील - कॉँग्रेस, राष्टÑवादीचे नेते
(धनंजय महाडिक यांच्यावर नाही.)
हसन मुश्रीफ - भाजप व चंद्रकांत पाटील
(संजय मंडलिक यांच्यावर नाही.)
सतेज पाटील- धनंजय महाडिक (युतीकडे दुर्लक्ष.)
चंद्रदीप नरके - ‘गोकुळ’च्या आडून पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक यांच्यावर टीका
पी. एन. पाटील - शिवसेनेवर टीका
राजेश क्षीरसागर- सत्यजित कदम यांच्यामुळे धनंजय महाडिक यांच्यावर टीका (कॉँग्रेस, राष्टÑवादीकडे दुर्लक्ष)