‘वडाप’ खड्ड्यात कोसळली
By Admin | Published: August 30, 2016 11:44 PM2016-08-30T23:44:03+5:302016-08-30T23:49:58+5:30
आठ जखमी : महाबळेश्वर येथे विद्यार्थी वाहतुकीवेळी अपघात
महाबळेश्वर : पाचगणीहून महाबळेश्वरला विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली वडाप जीप अवकाळी गावच्या हद्दीत रस्त्याकडेच्या वीस
फूट खड्ड्यात जाऊन पलटी झाली. यात जीप चालकासह आठ विद्यार्थी जखमी झाले. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून तीन विद्यार्थ्यांना वाईच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर तालुक्यातील टेकवली येथील गणपत वागळे यांची वडाप जीप आहे. ते या जीपमधून महाबळेश्वरच्या विद्यार्थ्यांना पाचगणीला दररोज ने-आण करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि. ३०) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पाचगणी येथून आठ विद्यार्थ्यांना घेऊन वडाप जीप महाबळेश्वरकडे येत होती. जीप अवकाळी हद्दीत आली असता महाबळेश्वरकडून वाईकडे जाणारी एसटी समोरून आली. एसटीला जागा देऊन पुढे जात असताना ही जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली.
यात जीपचालक गणपत वागळे यांच्यासह साक्षी प्रशांत मोरे (वय १५), सेजल निलेश धनावडे (१४), वेदांत दिलीप सुर्वे (१५), सुमित रवींद्र मोरे (१६), यश हनुमंत धनावडे (१२), साक्षी हनुमंत धनावडे (१४), साक्षी विजय जाधव (१६), यश रवींद्र मोरे (१५) हे जखमी झाले.
सर्व जखमींना महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती समजताच पालकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जखमीपैकी सुमित मोरे, सेजल धनावडे व साक्षी मोरे यांना पुढील उपचारासाठी वाई येथील खासगी रुग्णालयात पाठविले. याची पाचगणी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
एसटीच्या आगार व्यवस्थापकांना घेराव
समोरून आलेली बस अपघातास कारणीभूत असल्याची चर्चा शहरात सुरू झाल्याने संतप्त पालकांनी येथील बसस्थानकात गर्दी केली होती. युवासेनेचे व शिवसेनेचे पदाधिकारी विजय नायडू, शंकर ढेबे, सचिन वागदरे यांनी यासंदर्भात आगारप्रमुख रमाकांत शिंदे यांना घेराव घालत प्रश्नांचा भडिमार केला. स्थानकात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रज्ञा देशमुख हे कुमक घेऊन तत्काळ बसस्थानकात आल्या.