वैभववाडीला वादळी पावसाने झोडपले, आंबा, काजू पिकांचे नुकसान; झाड पडून वीजवाहिन्या तुटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 12:06 PM2020-04-30T12:06:53+5:302020-04-30T12:07:44+5:30
अनेक भागातील मळ्यांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी साचल्याचे पहायला मिळाले. वातावरणातील बदलामुळे घटलेले उत्पादन व पडलेल्या दरामुळे अगोदरच सकंटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे या पावसामुळे आणखीच नुकसान होणार आहे. त्याचबरोबर हापूस आंब्याचेही फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे
वैभववाडी : सह्याद्री पट्ट्यासह संपूर्ण वैभववाडी तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळी पावसाने पाऊण तासभर अक्षरश: झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे मांगवलीत झाड कोसळून वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे काही काळ वाहने अडकली होती. तर या पावसामुळे आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरण होते. उकाड्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास सह्याद्री पट्ट्यात विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच वादळासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळामुळे काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वादळाचा फटका सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांना बसला असण्याची शक्यता आहे. तालुक्यातील करूळ, सडुरे, नावळे, सांगुळवाडी, कुर्ली, वैभववाडी, कुंभवडे, कुसूर, भुईबावडा, वैभववाडी, खांबाळे, आचिर्णे, लोरे परिसराला पावसाने झोडपून काढले. तासभर झालेल्या पावसामुळे बाजारपेठेत पाणी साचल्याचे दिसून येत होते.
अनेक भागातील मळ्यांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी साचल्याचे पहायला मिळाले. वातावरणातील बदलामुळे घटलेले उत्पादन व पडलेल्या दरामुळे अगोदरच सकंटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे या पावसामुळे आणखीच नुकसान होणार आहे. त्याचबरोबर हापूस आंब्याचेही फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.
वाहने अडकली
अरुणा पुनर्वसन गावठाणापासून एक किलोमीटर अंतरावर मांगवली-वेंगसर मार्गावर झाड कोसळल्याने वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे या मार्गावरील वाहने काही काळ अडकून पडली होती. वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थांनी कोसळलेल्या झाडासह तुटलेल्या वीजवाहिन्या बाजूला करून मार्ग खुला केला. दरम्यान, वादळी वाºयाचा फटका संपूर्ण तालुक्यातील विविध भागाला बसला आहे.