वैश्य समाजाने उद्योग-व्यापाराकडे वळावे
By admin | Published: February 15, 2015 11:55 PM2015-02-15T23:55:48+5:302015-02-16T00:02:01+5:30
नारायण राणेंचे कौतुक
दीपक केसरकर : वधू-वर सूचक मेळावा; दोन तपांपासून कोल्हापूरकरांच्या सेवेत असल्याने एकाच घरात चार पदे : महाडिक
कोल्हापूर : वैश्यवाणी समाजाला उन्नत व श्रीमंत समाज म्हणून ओळखले जात होते, पण सध्या ८० टक्के समाज दारिद्र्यरेषेखाली आहे. गतवैभव मिळवून देण्यासाठी समाजाने उद्योग व व्यापाराकडे वळावे, असे आवाहन ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. वैश्य वाणी समाज, कोल्हापूर यांच्यावतीने आयोजित वधू-वर सूचक मेळावा व विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी महापौर नंदकुमार वळंजू होते. दीपक केसरकर म्हणाले, वैश्य वाणी समाज हा प्रेमळ आहे. या बळावरच अल्पसंख्याक असतानाही राजकीय क्षेत्रात प्रतिनिधित्व करत आहे. लग्न करताना नोकरदार मुलगा ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, वधू व वरांची पसंती करताना सौंदर्य न पाहता संस्कार व कर्तृत्व पाहावे, तरच संसाराचा गाडा सुरळीत चालतो. वैश्य समाजाच्या बोर्डिंगसाठी निधी दिला जाईल, त्यासाठी केंद्राच्या पैशांची गरज भासणार नाही. महाडिक कुटुंब तेवढे सक्षम आहे. दोन तपांपासून महाडिक कुटुंबीयांनी समाजकामातून कोल्हापूरकरांचा विश्वास संपादन केल्याने एकाच घरात दोन आमदार, खासदार व जिल्हा परिषद सदस्य आहेत. नारायण राणे यांच्यावर टीका करत आमदार राजेश क्षीरसागर यांनी दीपक केसरकर यांचे कौतुक केले. वैश्य बोर्डिंगसाठी २० लाखांची मदत जाहीर केली. पोपट ढवण यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार वळंजू, पांडुरंग पारकर, जयवंत वळंजू यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक ढवण यांनी आभार मानले. आमदार वैभव नाईक, मुंबई महापालिकेच्या महिला-बालकल्याण सभापती पूजा महाडेश्वर, शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, माधुरी नकाते, विभासू खातू, राजाभाऊ बेंडके, सुरेश कोरगावकर उपस्थित होते.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील
अनेक वक्त्यांनी केसरकर यांना मुख्यमंत्री व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या. हाच धागा पकडत केसरकर म्हणाले, एक ना एक दिवस शिवसेनेचे स्वबळावर राज्य येईल, त्यावेळी मी नव्हे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील. सध्या भाजप मोठा पक्ष असला, तरी आम्ही प्रेमाने जग जिंकणारी माणसे आहोत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
नारायण राणेंचे कौतुक
सिंधुदुर्गमधील उद्योजिका व कोल्हापूरची कन्या साक्षी वंजारी यांनी नारायण राणे यांचे कौतुक केले. त्यांच्यामुळेच उद्योग उभारणीस मदत झाल्याचे सांगितले. हाच धागा पकडत हे राजकीय व्यासपीठ नाही, काम करून निवृत्त झालेल्यांबद्दल आपण वाईट बोलत नसल्याचा टोला दीपक केसरकर यांनी साक्षी यांना हाणला.
१२ गुण आणि अंगठी
अलीकडे कुंडली पाहूनच लग्ने ठरविली जातात. आपल्याही लग्नात वडिलांनी कुंडली पाहिली, पण १२ गुण झाल्याने कुंडली जुळली नाही. कुंडली पाहणाऱ्याला सोन्याची अंगठी दिल्यानंतर १२ चे ३६ गुण झाले आणि अरुंधतीशी लग्न झाले. आमचा सोन्यासारखा संसार आहे. त्यामुळे कुंडली पाहू नका, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले.