Kolhapur: वैष्णवी पोवार खून प्रकरण: देवठाणेच्या मठातील दोन्ही महाराज राज्याबाहेर पळाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 11:47 AM2024-05-23T11:47:58+5:302024-05-23T11:48:26+5:30

सिंदगाव, श्रीरामपूर, नेवासा मठांची झडती ; नातेवाइकांचेही जबाब नोंदवले

Vaishnavi Powar murder case: Both Maharajas of Devthana Math run away from the state | Kolhapur: वैष्णवी पोवार खून प्रकरण: देवठाणेच्या मठातील दोन्ही महाराज राज्याबाहेर पळाले!

Kolhapur: वैष्णवी पोवार खून प्रकरण: देवठाणेच्या मठातील दोन्ही महाराज राज्याबाहेर पळाले!

कोल्हापूर : देवठाणे (ता. पन्हाळा) येथील मठात वैष्णवी पोवार या तरुणीचा खून झाल्यानंतर पळालेले बाळकृष्ण महाराज आणि महेश महाराज या संशयितांच्या शोधासाठी पोलिसांनी सिंदगाव (जि. उस्मानाबाद), श्रीरामपूर आणि नेवासा (जि. अहमदनगर) येथील मठांची झडती घेतली. तिन्ही ठिकाणी पोलिसांना महाराजांचा थांगपत्ता लागला नाही. अटकेच्या भीतीने दोघेही परराज्यात पळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या शोधासाठी परराज्यातील पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.

देवठाणे मठात ३ एप्रिलच्या रात्री वैष्णवी पोवार या तरुणीचा अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. मठातील प्रमुख बाळकृष्ण महाराज आणि त्याचा लहान भाऊ महेश महाराज याच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या समोरच तरुणीला मारहाण झाली. प्रकरण अंगलट येण्याचा अंदाज येताच दोन्ही महाराजांनी पहाटेच्या सुमारास मठातून पलायन केले.

तरुणीच्या खुनाचा गुन्हा दाखल झाल्याचे समजताच महेश महाराज याने मोबाइल वापरणे बंद केले. तासगाव (जि. सांगली) येथील एका भाविकाच्या घरात दोन दिवस थांबून ते सिंदगाव (जि. उस्मानाबाद) येथील मठात गेले. पोलिसांनी संपर्क केल्यानंतर महाराजांनी पळून जाण्यासाठी वापरलेली कार काही सेवकांमार्फत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात जमा केली. दोन दिवसात स्वत:हून हजर होण्याचे आश्वासन देऊन त्यांनी पलायन केले.

तीन मठांमध्ये शोध

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक मानसिंग राऊत यांच्या पथकाने सिंदगाव, श्रीरामपूर आणि नेवासा येथील मठांची झडती घेतली. मात्र, महाराजांचा थांगपत्ता लागला नाही. सिंदगाव येथून दोघे बाहेर पडल्यानंतर त्यांचा कोणाशीच संपर्क झाला नसल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली. बाळकृष्ण महाराज हा कर्नाटकात, तर महेश महाराज हा हिमाचल प्रदेशात पळाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांच्या शोधासाठी परराज्यातील पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे लक्ष्मीपुरी पोलिसांनी सांगितले.

येतो म्हणाले अन् पळाले

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी मोबाइलवरून संशयित महाराजांशी संपर्क साधला होता. तेव्हा दोघांनीही स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आश्वासन दिले. मात्र, गुन्ह्यात वापरलेली कार पाठवून ते दोघेही पसार झाले. पोलिसांनी सिंदगाव येथील संशयितांच्या घरी जाऊन आई, वडिलांचे जबाब नोंदवले आहेत.

भाविकाच्या नावावर घेतली कार

महेश महाराज याने नेवासा येथील एका भाविकाच्या कागदपत्रांचा वापर करून कारची खरेदी केली. कारच्या खरेदीसाठी त्याने नऊ लाख रुपये रोख दिले होते. तीच कार महाराजांकडून वापरली जात होती, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. त्याने भाविकांच्या नावांवर काही मालमत्तांची खरेदी केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

Web Title: Vaishnavi Powar murder case: Both Maharajas of Devthana Math run away from the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.