लिंगनूर-कापशीत दारूबंदीसाठी वज्रमूठ
By admin | Published: April 27, 2017 11:49 PM2017-04-27T23:49:46+5:302017-04-27T23:49:46+5:30
७०० महिलांच्या सह्या
म्हाकवे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निपाणी-राधानगरी राज्य महामार्गावरील लिंगनूर-कापशी (ता. कागल) येथील महामार्गालतची पाच दारू दुकाने उत्पादन शुल्क विभागाने बंद केली. मात्र, चारच दिवसांत या दुकानांना ग्रामपंचायतीने स्थलांतराचे परवाने देऊन ही दुकाने गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाडी व मुख्य वस्तीत सुरू करायला हातभार लावला. त्यामुळे तब्बल ७०० महिलांनी या दारू दुकानांचे परवानेच रद्दबातल करण्यासाठी कंबर कसली आहे.
सर्व महिलांच्या सह्या घेऊन लोकशाही मार्गाने लिंगनूर-कापशी येथील बाटली आडवी करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनावर शारदा जाधव, शोभा चेचर, कांता ढेंगे, ग्रा. पं. सदस्या मीरा किल्लेदार, तारुबाई चेचर, आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
१२ एप्रिलला सर्व सदस्यांच्या संमतीने त्यांना स्थलांतरित होण्याची परवानगी दिली होती. या दुकानदारांना स्थलांतरित होण्यासाठी परवानगी न देण्याची मागणी महिलांनी २४ एप्रिलला केली आहे. ही दारू दुकाने बंद करण्याबाबतचा निर्णय हा ग्रामपंचायतीचा नसून, उत्पादन शुल्क विभागाचा आहे.
नंदकुमार कुऱ्हाडे,
सरपंच, लिंगनूर-कापशी
उत्पादन शुल्क विभागाने टाळे ठोकलेल्या दारू दुकानांना अन्यत्र स्थलांतरित होण्यास परवानगी देण्यासंदर्भात कोणताही विषय विशेष सभेत नव्हता. आम्हाला विश्वासात न घेता सत्ताधाऱ्यांनी दुकानदारांना पाठीशी घालत स्थलांतराची परवानगी देण्याची गडबड केली आहे.
मीरा किल्लेदार, ग्रा. पं. सदस्या, लिंगनूर-कापशी.