Valentine Day : कोल्हापूर जिल्ह्यातून २० लाख फुले निर्यात, कोंडीग्रेचे लाल गुलाब परदेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:21 PM2018-02-14T13:21:49+5:302018-02-14T16:10:37+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडीग्रे (ता. शिरोळ ) येथील श्री वर्धन बायोटेक या हरितगृहातील १५ लाख लाल गुलाब आणि विविध रंगी ५ लाख फुलांसह एकूण २० लाख फुले व्हॅलेंटाईन डे साठी परदेशात पोहचली आहेत.
घन:शाम कुंभार
कोल्हापूर/यड्राव : कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडीग्रे (ता. शिरोळ ) येथील श्री वर्धन बायोटेक या हरितगृहातील १५ लाख लाल गुलाब आणि विविध रंगी ५ लाख फुलांसह एकूण २० लाख फुले व्हॅलेंटाईन डे साठी परदेशात पोहचली आहेत.
येथील श्री वर्धन बायोटेक मधील हरितगृहात व्हॅलेंटाईन डे साठी लाल गुलाब खास निर्माण केले. २१ लाख गुलाबांचे उत्पादन घेण्यात आले. २५ जानेवारीपासुन ९ फेब्रुवारीपर्यंत त्यापैकी २० लाख फुलांची ऑस्ट्रेलिया, इटली, जपान, ग्रीस, लंडनसह युरोपियन देशात निर्यात झाली आहे.
भारतीय बाजारपेठेत दिल्ली, मुंबई, नागपूर, हैद्राबाद, पुणे, औरंगाबाद, जबलपूर, याठिकाणी विक्री साठी ६ लाख गुलाब फुले उपलब्ध झाली आहेत.
फुलांची तोडणी केल्यापासून ती फुले परदेशातील बाजारपेठेत जाईपर्यंत, त्यांची विशेष काळजी घेतली जाते. फुलांच्या देठांच्या लांबीवरून फुलांचा दर अवलंबून असतो. जेवढा देठ लांब तेवढा दर जादा. फुलांचे देठ ४० सेमी ते ७० सेंमी पर्यंत लांबीचे असतात. ही सर्व फुले शितगृहाच्या माध्यमातून बाजारपेठेत जातात.
स्व. डॉ. सा. रे. पाटील यांच्या संकल्पनेतून श्रीवर्धन बायोटेकची जडणघडण उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी विकसित केली आहे.
व्हॅलेंटाईन डे साठी २५ जानेवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत परदेशात निर्यात झालेल्या गुलाब फुलांबरोबर जरबेरा, क्रीसांतियम, बडपॅरॅलीस व फिलर मटेरियल अशा विविध फुला-फळांनी बहरून कोंडीग्रे (ता. शिरोळ ) येथील हरितगृह पर्यटनस्थळ बनले आहे.
विविध शैक्षणिक संस्थासह निसर्ग प्रेमी मंडळी येथे भेटी देऊन नेत्रसुख अनुभवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय साहित्यिक शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.
कोंडीग्रे (ता. शिरोळ ) येथील हरितगृहाची सर्व व्यवस्था रमेश पाटील, राजू पाटील, नितीन देसाई, विलास गोविलकर, सुभाष नायर, संदीपन शिंदे, राजू जगताप, रवी डोमने, सोमेश्वर लोकरे आणि त्यांचे श्रीवर्धन बायोटेकमधील सहकारी अत्याधुनिक पद्धतीने साकारत आहेत.