Valentine Day: 'ती' पत्रं.. हुरहुर..धडधड, मोबाइल बंद; प्रेम व्यक्त करण्याचा बदलला रंग
By इंदुमती सूर्यवंशी | Published: February 14, 2023 12:30 PM2023-02-14T12:30:13+5:302023-02-14T12:49:28+5:30
मोबाइल नामक यंत्राने प्रेमाच्या या हळुवार बंधाचेही यंत्रच करून टाकले
इंदुमती गणेश
कोल्हापूर : ती शाळा- कॉलेजात आली की नजर चोरून पाहायचं, धाडसानं पत्र लिहायला घ्यायचं.. काय लिहू अन् कसं लिहू.. अरेरे हे चुकलं असं म्हणत किमान पाच-सहा वेळा फाडून टाकायचं... अंतिम मसुदा तयार झाला की तिच्यापर्यंत पोहोचवण्याची हिंमत गोळा करायची. मैत्रिणीकरवी पत्र तिच्या हातात पडलं की हुरहुर घेऊन दिवसाची चैन आणि रात्रीच्या झोपेचं खोबरं करून महिनोनमहिने घालवायचे, होकार आला तर स्वर्गाला हात टेकले.. नकार आला तर डोळ्यात अश्रूंचा बांध घेऊन निघून जायचं ते तिच्यासमोर पुन्हा कधीही यायचं नाही, हा पण करूनच.. आता मोबाइल नामक यंत्राने प्रेमाच्या या हळुवार बंधाचेही यंत्रच करून टाकले आहे.
गेला आठवडाभर रोझ डे, चॉकलेट डे, साजरे होत असताना त्यांचा सर्वोच्च बिंदू असतो तो १४ फेब्रुवारीचा व्हॅलेंटाइन डे. अर्थात प्रेम दिवस. आत्ता जे शाळा-महाविद्यालयीन मुला-मुलींचे आई-बाबा आहेत त्यांच्या तारुण्याच्या काळात प्रेमात पडणं हाच मोठा गुन्हा होता. प्रेम व्हायला आणि तुटायलाही वेळ लागायचा. घरात कळले तर तांडव व्हायचे. आता मोबाइल युगाने प्रेमातही यांत्रिकता आली आहे, पत्रांची जागा व्हॉट्सॲपने घेतली. तेवढ्यापुरती हुरहुर वाढते; पण होकार-नकारही इन्स्टंट कळतो. होकार आला तर प्रकरण पुढे जातं, नाही तर ठीक आहे.. असं म्हणत सोडून देताना आपण चांगले मित्र बनून राहू, असेही आश्वासन मिळते. प्रेम आणि ब्रेकअपही झटपट होतं.
पत्रं, चिठ्ठ्या आणि मित्र-मैत्रिणींचा आधार
मोबाइल नसल्याने पत्रं, चिठ्ठ्या आणि मित्र-मैत्रिणींचा आधार. तेदेखील लष्कराच्या भाकरी मोठ्या मनाने भाजत जबाबदारी पार पाडायचे. शाळा-महाविद्यालयात एखादे प्रकरण गाजायचेच. वह्यांमधून चिठ्ठ्या पोहोच व्हायच्या. मुद्दाम एखाद्याने किंवा एखादीने ते शिक्षकांपर्यंत पोहोचवले की पालकांना बोलावून बिन पाण्याची धुलाई व्हायची.
शुभेच्छापत्रं झाले कालबाह्य...
शुभेच्छापत्रांची त्यावेळी चलती होती. प्रेमाचेच नव्हे, भाऊ-बहीण, पालक कोणाबद्दलही आपल्या भावना व्यक्त करायचे असले तरी शुभेच्छापत्रं दिली जायची. त्यामुळे ग्रिटिंग आणि भेटवस्तूंची दुकानेही मोठ्या प्रमाणात होती.