प्रिय व्यक्तीकडे प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी २४ लाख गुलाब बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:42 AM2020-02-12T00:42:52+5:302020-02-12T00:47:44+5:30
यंदा उत्पादनात २५ टक्क्यांनी घट झाल्यामुळे निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे परदेशातील बाजारपेठेत फुलांची निर्यात करण्यापेक्षा देशांतर्गत बाजारात फुलांची विक्री करण्यावर उत्पादकांनी भर दिला आहे. शिवाय बाजारपेठेत दर देखील चांगला मिळाला आहे.
संदीप बावचे ।
जयसिंगपूर : देश-परदेशातील प्रेमीवीरांना भुरळ घालणाऱ्या गुलाब फुलांच्या उत्पादनात यंदा २५ टक्क्यांनी घट झाली आहे; त्यामुळे गुलाबांची निर्यात यंदा निम्म्यावर झाली. शिरोळ तालुक्यातून यंदा दहा लाख गुलाब फुलांची निर्यात झाली आहे, तर देशांतर्गत बाजारपेठेत १४ लाख अशी एकूण २४ लाखांहून अधिक गुलाब फुले तालुक्यातून गेली आहेत. वातावरणातील बदलांमुळे यंदा गुलाबांच्या उत्पादनात घट झाली असून, गुलाब फुलाला चांगला दर मिळाल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत गुलाब फुले पाठविली जात आहेत. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा गुलाब फुलांची निर्यात कमी झाली आहे.
प्रेमाचे प्रतीक म्हणून लाल गुलाबाला महत्त्व आहे. आपल्या प्रिय व्यक्तीकडे प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. युरोपीयन राष्ट्रासह भारतामध्येही व्हलेंटाईन दिवस युवक-युवती उत्साहात साजरा करतात. यावेळी लाल गुलाब फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, यंदा वातावरणातील बदलामुळे गुलाब फुलांच्या उत्पादनात घट झाली असून, निर्यात निम्म्यावर आली आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने १ ते ९ फेब्रुवारीपर्यंत गुलाब फुले निर्यात केली जातात. मात्र, यंदा डिसेंबर महिन्यात थंडी नसल्यामुळे भारतीय बाजारपेठेत फुले लवकर आली. मागील दोन वर्षांत जवळपास चौदा लाखांहून अधिक फुले निर्यात झाली होती. यंदा उत्पादनात २५ टक्क्यांनी घट झाल्यामुळे निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे परदेशातील बाजारपेठेत फुलांची निर्यात करण्यापेक्षा देशांतर्गत बाजारात फुलांची विक्री करण्यावर उत्पादकांनी भर दिला आहे. शिवाय बाजारपेठेत दर देखील चांगला मिळाला आहे. कोंडीग्रे येथील श्रीवर्धन बायोटेक व जांभळी येथील स्टार ग्रीन हाऊसमध्ये विविध रंगी गुलाबांसह जरबेरा, क्रिसांतियम, बडपपॅरालीस, फिल्मटेरियल अशी फुले हरितगृहात उत्पादित केली जातात. व्हॅलेंटाईन डे साठी परदेशातील हॉलंड, लंडन, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड याठिकाणी लाल गुलाब निर्यात करण्यात आला आहे, तर देशांतर्गत दिल्ली, मुंबई, पुणे, भोपाळ, हैदराबाद, गोवा याठिकाणी गुलाबांना मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.
तीन वर्षांच्या तुलनेत फुलांना चांगला दर
फुलांची तोडणी केल्यापासून ती परदेशातील बाजारपेठेत जाईपर्यंत त्याची विशेष काळजी घेतली जाते. फुलांच्या देठाच्या लांबीवरून त्या फुलाचा दर अवलंबून असतो. मात्र, यंदा वातावरणातील बदलामुळे फुलांच्या उत्पादनात २५ टक्के घट झाली आहे. थंडी नसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. मात्र, ज्या उत्पादकांनी योग्य नियोजन केले, त्यांच्या फुलांना चांगला दर मिळाला आहे. निर्यातीत ९ रुपयापांसून १८ रुपयांपर्यंत गुलाब फुलाला दर मिळाला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत ९ ते १३ रुपये दर मिळाला असून, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत २५ टक्के अधिक दर मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा चांगला दर असल्याचे सांगण्यात येते.