पराभव दिसू लागल्यानेच मुश्रीफ यांच्याकडून वल्गना - राहुल चिकोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 10:33 AM2021-02-01T10:33:40+5:302021-02-01T10:35:12+5:30
Politics Kolhapur- मुघल सैनिकांना जसे पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे, तसे कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रत्येक ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिसत आहेत. निवडणुकीत आपला पराभव दिसू लागल्यानेच त्यांच्याकडून वल्गना सुरू असल्याची टीका भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून केली.
कोल्हापूर : मुघल सैनिकांना जसे पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे, तसे कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रत्येक ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिसत आहेत. निवडणुकीत आपला पराभव दिसू लागल्यानेच त्यांच्याकडून वल्गना सुरू असल्याची टीका भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून केली.
खोटे बोल, पण रेटून बोल, या उक्तीप्रमाणे मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाबडेपणाचा खोटा आव आणला आहे. कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना अनेक तांत्रिक त्रुटींमुळे रेंगाळली. तीर्थक्षेत्र विकास आराखडासुद्धा महापालिकेच्या उदासीनतेमुळे रखडला आहे; पण निवडणुकीच्या तोंडावर ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. गेल्या पाच वर्षांतील त्यांच्या अपयशी कारभाराचे खापर ते भाजपवर फोडू पाहत आहेत.
महापालिकेत ढपला पाडण्याची पद्धती त्यांच्याच काळात रुजली. चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री असताना कोल्हापूर महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य केले. भाजप युतीची सत्ता असताना राजकीय द्वेषातून आणि भाजपला श्रेय मिळू नये, यासाठी महापालिकेने अनेक प्रस्ताव पाठवले नाहीत.
महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आता कोल्हापूरकरांची दिशाभूल करायची, असा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. मात्र कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, त्यांना वस्तुस्थिती माहीत आहे.
या मंडळींच्या काळातच कोल्हापूरकरांवर टोल लादला. द्वेषातून बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा मंत्री मुश्रीफ यांनी द्वेषाचा चष्मा उतरून चंद्रकांत पाटील यांची विकासकामे पाहावीत, असेही चिकोडे यांनी पत्रकात म्हटले आहे.