व्हॅली क्रॉसिंगचा थरार पर्यटकांसाठी ठरला पर्वणी
By Admin | Published: January 21, 2016 12:16 AM2016-01-21T00:16:11+5:302016-01-21T00:24:31+5:30
२४० जणांचा भाग : सहा वर्षाच्या बालिकेपासून ७० वर्षाच्या मावळ्याने जागवला विशाळगडचा गनिमी कावा
आर. एस. लाड -- आंबा -किल्ले विशाळगडचा रांगडा बुरुज, खोल दरीतील धुके, त्यातून डोकावणारा प्रभानवल्लीचा जलाशय नि समोरील सह्याद्रीच्या पहाडी रांगा डोळ्यांत साठवत व्हॅली क्रॉसिंगची अनुभूती देणारा थरार कोल्हापूर, मुंबई व बेळगाव परिसरातील हौशी पर्यटकांना तारुण्यात घेऊन गेला.गेल्या तीन दिवसांत हिल रायडर्स व वेस्टर्न माउंटन स्पोर्टस् आयोजित साहसी पर्यटनातील व्हॅली क्रॉसिंगचा थरार २४० गिर्यारोहकांनी अनुभवला. सहा वर्षाच्या वैष्णवी जाधवपासून ७० वर्षाच्या दत्तात्रय थोराडेंपर्यंतच्या मावळ्यांनी विशाळगडचा गनिमी कावा पुन्हा जागवला. शनिवार व रविवारची आठवडी सुटी या थरार अनुभवातून इतिहासाच्या स्मृती जागवणारी ठरली. मुंढा दरवाजातून भोवतालच्या दऱ्या डोळ्यांत साठवणारी मंडळी यावेळी मात्र सेल्फीची स्टीक सांभाळत गडावरून दरीकडे घेतलेला हवेतील सूर टिपत, पहाडी सह्याद्रीवर स्वार झाल्याचा आनंद घेत होती. युवकांबरोबर मुली व महिलांची संख्या पन्नासवर गेली. महिलांचा उत्साह तोंडात बोटे घालणारा ठरला. शनिवारी सत्तर, रविवारी शंभर व सोमवारी ७२ गिर्यारोहकांनी थरार अनुभवल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले. स्थानिकांच्या मदतीबरोबर त्यांच्यात उपक्रमाबाबत उत्सुकता मोठी दिसली. कोल्हापूरच्या साहसी पर्यटनात नवी क्रेझ देणारा हा उपक्रम मर्यादित काळाची मोहीम न राहता हा थरार कायमस्वरूपी पर्यटकांना अनुभवता यावा, साहसी थ्रील सामान्यांना लुटता यावे म्हणून शासनाने या उपक्रमाला पर्यटन सुविधेत सामावून घेणाची मागणी पर्यटकांनी केली. कोल्हापूरसह इचलकरंजी, सातारा, बेळगाव, गुहागर येथील तरुण गिर्यारोहणात सहभागी झाले. या उपक्रमात प्रमोद पाटील, विनोद कांबोज, मेहबूब मुजावर, प्रमोद माळी, शिवतेज पाटील, संतोष कदम, परेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सोमवारी सायंकाळी पाच वाजता ही मोहीम थांबली.
01गिर्यारोहकांची काळजी घेणारे कार्यकर्ते तीन दिवस उन्हात, तसेच रात्रीच्या कडाक्याच्या थंडीतही उत्साह टिकवून होते. रविवारी व सोमवारी सकाळचे धुके होते. धुक्यातले क्रॉसिंग डोळे दीपवणारे ठरले. संयोजकांनी सहभागी गिर्यारोहकांना चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली होती. मात्र, पायथ्याला पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने विकत पाणी घ्यावे लागले. २०० रुपये बॅरल असा पाण्याचा दर होता. तीस कार्यकर्ते दिवस-रात्र झटले.
02कोल्हापूरचे उपप्रादेशिक अधिकारी सतीश जाधव यांची कन्या सहा वर्षाच्या वैष्णवीने येथील थरार अनुभवला. शनिवारी ती बागेत खेळताना पडली नि तिच्या डाव्या हाताला दुखापत झाली. तरीही तिने बँडेज बांधून विशाळगडची दरी पार केली. चिमुकलीच्या साहसाचे दर्शकांतून कौतुक झाले. दीड वर्षाच्या बालिकेसह एका मातेनेही हा थरार अनुभवला
03शिवकालीन गड परिसरात हे साहसी उपक्रम पर्यटकांना उपलब्ध केले तर शिवकालीन इतिहास नव्या पिढीत रुजविता येईल व गडाचे संवर्धन करण्यास चालना मिळेल, असा विश्वास प्रमोद पाटील व कांबोज यांनी समारोपात व्यक्त केला.