वडगावचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर

By admin | Published: February 18, 2016 11:39 PM2016-02-18T23:39:31+5:302016-02-19T00:22:20+5:30

नगरपालिका सभेत एकमताने निर्णय : करवाढ नाही, एक कोटी नऊ लाखांतून विकासकामे

Valuation of Wadgaon Budget | वडगावचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर

वडगावचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर

Next

पेठवडगाव : वडगाव नगरपालिकेने करवाढ न करता एक कोटी नऊ लाख १८ हजार १२८ रुपये शिलकीचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर केले.२०१६-१७ या आर्थिक वर्षात भाजी मार्केट नव्याने विकसित करणे, सुधारित विकास आराखड्याचे नियोजन करणे, रस्त्यांचे डांबरीकरण, सुजल-निर्मल नगरोत्थानमधून शहरात सुधारित पाणीपुरवठा योजना, रमाई आवास घरकुल योजना, महालक्ष्मी तलावाचे संवर्धन ही कामे प्रस्तावित आहेत. पालिकेच्या स्व. विजयसिंह यादव सभागृहात गुरुवारी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा विद्या पोळ होत्या. विषयपत्रिकेचे वाचन सतीश पकाले यांनी, तर अर्थसंकल्पाचे वाचन उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी केले. सदस्यांच्या प्रश्नांना मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी उत्तरे दिली. अर्थसंकल्पात २०१६-१७ मध्ये जमा बाजूमध्ये महसुली करापासूनचे उत्पन्न एक कोटी ३६ लाख २० हजार, अनुदाने चार कोटी ६३ लाख ७४ हजार, पालिकेच्या मालमत्तापासूनचे उत्पन्न २६ लाख ८० हजार, फी-भाडे-आकार उत्पन्न १७ लाख ४५ हजार, असे एकूण उत्पन्न सात कोटी २३ लाख २५ हजार रुपये दाखविण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनाअंतर्गत निधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नगरोत्थान अभियानातून तीन कोटी ५० लाख, रस्ता अनुदान, तीन कोटी सुजल-निर्मल योजना, दोन कोटी १५ लाख १४० व्या वित्त आयोगातून दोन कोटी, वैशिष्ट्यपूर्ण काम योजनेतून एक कोटी ७५ लाख, असा १५ कोटी ८८ लाखांचा अनुदानाचा निधी मिळण्याची शक्यता आहे. अशी असाधारण जमा एक कोटी ६९ लाख दोन हजार, तर आरंभीची तीन कोटी ३९ लाख ११ हजार २२८ रुपये आहे. त्यामुळे २८ कोटी १९ लाख ३८ हजार २२८ रुपये शिल्लक दाखविण्यात आलेले आहेत. पालिका हद्दीतील दिंगे कॉलनी, गांजवे बोळ, शाहू कॉलनी येथे आरसीसी गटर, नवीन वसाहतीमध्ये रायगड कॉलनी ते नायकवडी गल्ली, राऊत कॉलनीतील मुख्य रस्ता, आदी रस्त्यांचे खडी व डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच नव्याने भाजी मार्केट विकसित करण्यात येणार आहे. प्रश्नोत्तरांच्या तासात संतोष गाताडे यांनी वाहतूकप्रश्नी वडगाव पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला. याप्रश्नी वरिष्ठांकडे दाद मागावी, असे आवाहन केले. उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी सणगर, कुंभार गल्लीतील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला, तर रंगराव पाटील-बावडेकर यांनी बाजारांचे नियोजन योग्य प्रकारे झालेले नाही याकडे लक्ष वेधले, तर पालिकेचे कर्मचारी व्यापाऱ्यांबरोबर उद्धट वर्तन करतात, असा अभिजित पोळ यांनी आरोप केला. (प्रतिनिधी)


नगरसेवकांचा प्रतिसाद : कचराकुंडीसाठी मदत
कचरा संकलित करण्यासाठी दोन कचराकुंड्या देण्यासाठी लोकसहभागातून नगरसेवकांनी मदत करावी, असे आवाहन मुख्याधिकारी मुतकेकर यांनी केले. त्यास तत्काळ प्रतिसाद देत विश्रांत माने यांनी पाच हजार रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानंतर सर्वच नगरसेवकांनी पाच हजार देण्याचे मान्य केले.

Web Title: Valuation of Wadgaon Budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.