स्पर्धेतही वैद्यकीय सेवेची मूल्ये जोपासावीत
By admin | Published: September 18, 2015 12:20 AM2015-09-18T00:20:04+5:302015-09-18T00:32:19+5:30
वेदप्रकाश मिश्रा : तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचा पदवीदान सोहळा
नवे पारगाव : वैद्यकीय व्यवसायात सेवाभाव हवा. या व्यवसायात स्पर्धा वाढली असली तरी वैद्यकीय सेवेची मूल्ये जोपासायला हवीत. वैद्यकीय शिक्षणाची पदवी संपादन केलेल्यांनी कोणताही भेदभाव न करता रुग्णसेवा करावी, असे आवाहन कृष्णा वैद्यकीय विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेद प्रकाश मिश्रा यांनी केले. नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाच्या कोल्हापूर येथे झालेल्या पदवीदान समारंभात कुलगुरूमिश्रा मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. दंत महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधाकरराव कोरे अध्यक्षस्थानी होते. कुलगुरूमिश्रा म्हणाले, नवीन वैद्यकीय क्षेत्रात उतरणाऱ्या डॉक्टरांनी व्यवसाय मूल्यांशी कटिबद्ध रहावे. डॉ. शैलेश कोरे म्हणाले, पदवी घेतलेल्या वैद्यकांनी दंत महाविद्यालयाचा व गुरुजनांचा सन्मान वाढेल, अशी रुग्णसेवा करावी. डॉ. सुधाकरराव कोरे म्हणाले, वैद्यकीय सेवा बजावत असताना आपण कुठे कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी. जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन दंत महाविद्यालयाचे नाव उंचावेल अशी सेवा करावी.
आदर्श विद्यार्थिनी म्हणून डॉ. चैत्राली कलगुटकर यांना गौरविण्यात आले. यावेळी डॉ. किशोर चौगुले, डॉ. सात्विक कुलकर्णी, डॉ. शेखर उमराने, डॉ. संकेत इंगळे, डॉ. प्रदीप पाठक, डॉ. खुशनमा चोक्सी, आदींची भाषणे झाली. (वार्ताहर)