संत संगतीचे मोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:59 PM2019-07-07T23:59:46+5:302019-07-07T23:59:51+5:30

इंद्रजित देशमुख तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी. या तुकोबारायांच्या वचनातून त्यांना संत संगतीचे मोल सांगावयाचे आहे. वारकरी ...

The value of saint accompaniment | संत संगतीचे मोल

संत संगतीचे मोल

googlenewsNext

इंद्रजित देशमुख
तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी.
या तुकोबारायांच्या वचनातून त्यांना संत संगतीचे मोल सांगावयाचे आहे. वारकरी संप्रदायात जो परिपक्व झाला, प्रेमरूप झाला त्याला संत असे म्हटले आहे. शेंदाड पिकल्यानंतर त्यातला जसा कडूपणा जातो, तसा संत हा गोड बनून जातो. जसे की शेंदाड पिकल्यानंतर ते गोड होते. ते मऊ होते. त्याचा रंग बदलतो आणि त्याला सुगंधही येतो. हे चार बदल होतात. तसेच संतही गोड होतात, मऊ होतात आणि त्यांच्या सात्त्विकतेचा सुगंधही पसरतो. अशा संतांचा संग जर मिळणार असेल तर आम्हाला मोक्षही नको, वैकुंठही नको, कारण या संतांचा सहवास हा मोक्षापेक्षाही आनंद देतो. संतत्वाला पोहोचलेली व्यक्ती ही देवच बनून गेलेली असते.
आत्मज्ञाने चोखडी । संत जे माझी रुपडी ।
असे हे संत पूर्ण ज्ञानी असतात. अशा संतांच्याकडून ज्ञान प्राप्त करावयाचे झाल्यास ते कसे करावे याचे सूत्र ज्ञानेश्वर माउलींनी सांगितले आहे.
ते ज्ञान पै गा बरवे । जरी मनी आथि जाणावे । तरी संता या भजावे । सर्वस्नेसी.
निर्दोष जगण्याच्या मात्रेची गोळी घ्यावयाची असल्यास या संतांकडेच जावे लागेल. अशा संतांची लक्षणे संत साहित्यामध्ये अनेक ठिकाणी दिली आहेत. तो कसा असतो हे नाथराय भागवतात सांगतात.
मग त्याचिया निजदृष्टी । मीची एक अवघी सृष्टी ।
मावळली द्वंद्व त्रिपुरी । सुखदु:ख पाठी लागेना ।।
त्याच्या अंत:करणात असलेले परमात्म्याचे अधिष्ठान साधनेने जागृत झालेले असते. म्हणून त्याला सर्वत्र परमात्म्याची सत्ता अनुभूतीला येत असते. त्यांची द्वंद्वे नाहीशी झाल्यामुळे त्यांना स्तुती आणि निंदा सारखीच वाटत असते. संत जिकडे जातील तिकडे कृपेचा वर्षाव करत असतात. ते जातील ती दिशा प्रेमाने, स्नेहाने भारावून टाकत असतात.
जगाच्या कल्याणासाठी आपला प्राणही देण्याची त्यांची तयारी असते. ते संसारात अखंड बुडालेल्यांना वर काढीत. आर्तांची गाºहाणी फेडीत. आर्तांच्या आयुष्यात अभ्युदयाची सुरुवात करीत. त्यांच्या आयुष्याच्या सौंदर्याची अनुभूती देत संत आयुष्य वेचीत असतात.
अनेकांच्या आयुष्याच्या वाटा उजळण्यासाठी ते येतात. साधनेच्या वाटेवर चालणाऱ्या साधकाला नेमके मार्गदर्शन करण्याकरिता ते येतात. त्यांच्या स्वत:च्या आयुष्याचे सारे आशापाश संपलेले असतात. ते अखंड प्रसन्न असतात आणि शांती त्यांच्या हृदयात सतत वास करून असते. त्यांच्याजवळ बसल्यावर कोणीतरी सज्जन सोयराच आपले हित साधण्याकरिता आला आहे असे वाटते.
तुकोबारायांनी तर संतांचे नेमके वर्णन केले आहे. व्यवहारात आणि परमार्थात तो कसा असतो.
जे का रंजले गांजले ।
त्यासि म्हणे जो आपुले ।।१।।
तोचि साधू ओळखावा ।
देव तेथेचि जाणावा ।।२।।
मृदू सबाह्य नवनीत ।
तैसे सज्जनाचे चित्त ।।३।।
ज्यासि अपंगिता नाही ।
त्यासि धरी जो हृदयी ।।४।।
दया करणे जे पुत्रासी ।
तेचि दासा आणि दासी ।।५।।
तुका म्हणे सांगू किती ।
तोचि भगवंताच्या मूर्ती ।।६।।
संत हा अत्यंत करुणेने आणि प्रेमाने जगत असतो. त्याला जगाचे दैन्य सहन होत नाही. तो अंतर्बाह्य मऊ असतो. जगामध्ये जे अंध, अपंग आहेत त्यांना तो हृदयाशी कवटाळून फक्त प्रेमच देतो. तो आपल्या घरातील दास-दासींना आपल्या प्रेमळ पुत्र कन्येप्रमाणे वागवतात. त्यांच्यात भेद ठेवत नाहीत. अशा अनंत सद्गुणांनी ते वर्तन करत असतात. त्यांच्या हृदयात अनंत करुणा, अनंत समता, अनंत आनंद आणि अनंत मैत्रीभाव वसलेला असतो.
असे हे संत वारीमध्ये असतात. अशा संतांच्या भेटीने दोष निघून जातात. या वारीच्या प्रबोधन पर्वात होणारी प्रवचने, कीर्तने साधकास प्रेरणा देतात.
देव पाहण्यासाठी गेलो आणि देवचि होऊनि गेलो, असे व्हावयास हवे. साधनेचा प्रवास हा देव पाहणे, देवाचा शोध घेणे यासाठी नसतो, तर स्वत: देवरूप होण्याचा असतो. दोषयुक्त, विकारयुक्त जगणे सोडून निर्दोष, प्रेमपूर्ण जगण्याचा प्रवास म्हणजे साधना. अंत:करण विशाल होणे आणि समरसून जाणे म्हणजे संतत्व. तुका अणुरेणया थोकडा। तुका आकाशा एवढा ।।
आकाशाएवढे होण्यासाठी संतसहवास हवा.
(लेखक संत साहित्याचे
अभ्यासक आहेत.)

Web Title: The value of saint accompaniment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.